आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन्न सुरक्षा कायद्यात सुधारणा करणार; राज्यमंत्री दानवे यांची माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- अन्न सुरक्षा विधेयकाला 4 जुलै रोजी वर्ष पूर्ण होत आहे. या कायद्याची 11 राज्यांनी अंमलबजावणी केली असून, त्याच्या सर्व पैलूंचा आढावा घेतला जाईल. कायद्याला अधिक बळकटी देण्यासाठी त्यातील त्रूटी दूर करून अत्यावश्यक सुधारणा तसेच याच वर्षात विभागाचे संगणकीकरण केले जाईल, अशी माहिती केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली.
कृषी भवनात अन्न व नागरी पुरवठा विभागात पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर बुधवारी ते ‘दिव्य मराठी’शी बोलत होते. दानवे म्हणाले, खात्याचे कॅबिनेट मंत्री रामविलास पासवानांनसह मी गेल्या दोन दिवसांत अन्न सुरक्षा विधेयक, अंत्योदय योजना, एपीएल आणि बीपीएल प्रणाली, अन्न वितरण व्यवस्थेबाबत माहिती घेतली.त्यातून सध्याच्या व्यवस्थेत बदल करण्याची गरज असल्याचे लक्षात आले आहे. भाजप जाहीरनाम्यानुसारच आमची कार्यपद्धती असेल.महागाई कमी करण्यालाही आम्ही प्राथमिकता देत आहोत, असे दानवे यांनी स्पष्ट केले.

अन्न सुरक्षेचा आढावा : सध्या महाराष्ट्र, हरियाणा, राजस्थान, दिल्ली, बिहार, हिमाचल, मध्य प्रदेश, पंजाब, चंदीगड, कर्नाटक, छत्तीसगड या राज्यात अन्न सुरक्षा योजना राबविली जात आहे. या राज्यांत 11 महिन्यात या योजनेच्या सकारात्मक परिणामांचा आढावा घेणार आहोत. गेल्या वर्षभरात या योजनेसाठी राज्यांना 131.66 कोटी रुपयांची सवलत दिली. तसेच योजनेसाठी वर्षाला 624.3 लाख टन अन्न लागणार आहे, असे त्यांनी सांगितले.