आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य: येदियुरप्पा म्हणतात, येऊ का घरात...?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - कर्नाटकात सत्ता गेल्यानंतर बी.एस. येदियुरप्पा यांना भाजपचे वेध लागले आहेत. भाजपलादेखील लोकसभेसाठी येदियुरप्पांची गरज आहे. पक्ष प्रवेशावरून दोन्ही बाजूंनी ‘पहले आप’ सुरू असतानाच, येड्डींना स्वगृही जाण्याची घाई झाल्याचे दिसते.


राज्यातील भाजपचे अनेक नेते आपल्या संपर्कात आहेत, असा दावा करतानाच योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल, असे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांनी स्पष्ट केले आहे. भाजपच्या नेत्यांबद्दल अशा प्रकारे जाहीर वक्तव्य करण्याची येदियुरप्पांची ही पहिलीच वेळ आहे.


भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंहपासून पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते माझ्या संपर्कात आहेत. त्यांच्याकडून आपले मन वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे, परंतु योग्य वेळ आल्यानंतरच त्याबद्दल काही ठरवता येऊ शकेल. अद्याप मी कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यासाठी अगोदर सहका-यांशी चर्चा करावी लागेल. त्यानंतरच अंतिम निर्णय होईल, असे संकेत त्यांनी दिले.


गेल्या काही आठवड्यांपासून भाजप व केजेपीमध्ये येदियुरप्पा यांच्या स्वगृही परतण्याच्या चर्चेला सुरुवात झाली आहे. येदियुरप्पा यांच्या पक्षाला अलीकडे झालेल्या विधानसभा निवडणुकीत 10 टक्के मते मिळवता आली. स्वगृही परतण्यासाठी प्रथम कोण पाऊल उचलणार, याला काहीही महत्त्व नाही, परंतु भाजपमध्ये पुन्हा जाण्याचा आनंद असेल का, या प्रश्नावर अद्याप काहीही निर्णय घेतलेला नाही, असे उत्तर येदियुरप्पा यांनी दिले. मी एका पक्षाचे नेतृत्व करतो. त्यामुळे या मुद्द्यावर मला खासगी मत नाही. स्वगृही परतण्यासंदर्भात भाजपसोबत कसलीही चर्चा झाली नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.


भाजपने गेल्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकात 28 पैकी 18 जागा मिळवल्या होत्या. भाजपला राज्यात पुन्हा अशीच कामगिरी करण्याची संधी मिळेल का, या प्रश्नावर येदियुरप्पा म्हणाले, काही दिवस प्रतीक्षा केली पाहिजे. लोकसभेची निवडणूक होण्यास आणखी अवकाश आहे. इतर पक्ष कशाप्रकारे प्रतिसाद देतात, हे पाहावे लागेल.