आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजब प्रकरण: बाळाच्या हसण्याने कुटुंबाचा थरकाप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उडुपी - कर्नाटकमधील उडुपी जिल्ह्यातील एक अजब प्रकरण उजेडात आले. गोविंदा नावाचा नारळ तोडणारा मजूर आणि त्याचे कुटुंब काही दिवसांपासून घाबरलेल्या मन:स्थितीत वावरत होते. कारण होते एका बाळाचे हसणे. गोविंदाच्या घराजवळ नारळाचे झाड आहे, परंतु काही दिवसांपासून नारळाच्या झाडातून बाळाच्या हसण्याचा आवाज येत असल्याने तो त्रस्त झाला होता. बाळाच्या खदखदा हसण्याचा आवाज नेमका कोठून येतोय, हे त्याला कळत नव्हते. कोणालाच त्याचा पत्ता लागत नव्हता. तो नारळाजवळ गेल्यानंतरही त्याला काही दिसत नव्हते. अखेर कुटुंबाने या प्रकरणावर अनेक उपाय केले, परंतु काहीही फायदा झाला नाही. शेवटी ते एक ज्योतिषाकडे गेले. ज्योतिषाने घर आणि परिसराची पाहणी केली. त्यानंतर त्याने घरावर वाईट आत्म्याची छाया असल्याचे गोविंदाला सांगितले. ही छाया दूर करण्यासाठी हवन करावे लागेल, असा सल्ला दिला. गोविंदा वाटले, ज्योतिषाच्या बोलण्यात काहीतरी नक्कीच तथ्य असले पाहिजे. कुटुंबाने त्याच्या म्हणण्यानुसार हवन केले, परंतु हसण्याची समस्या कायम राहिली.
एक दिवस अचानक या समस्येवरील तोडगा आपोआप समोर आला. नारळ तोडणारा एक मजूर आपला हरवलेला मोबाइल शोधण्यासाठी गोविंदाच्या घरी पोहोचला. सीना पुजारी नावाचा हा मजूर नारळ तोडण्यासाठी गोविंदाच्या घरी नेहमी येत असे. एकेदिवशी तो नारळ तोडण्यासाठी पोहोचला होता. तेव्हा त्याने आपला मोबाइल एका प्लास्टिक बॅगमध्ये गुंडाळून झाडावरच ठेवला होता, परंतु त्याला या गोष्टीचा विसर पडला. काही दिवसांनंतर त्याला मोबाइलची आठवण आली, परंतु तो सापडत नव्हता. ही रिंगटोन वाजल्याने गोविंदाच्या कुटुंबाला बाळ हसत असल्याचे वाटे. दरम्यान, सीनाला नंतर त्याचा फोन गोविंदाच्या झाडावर असल्याचे आठवले. मग तो फोन घेण्यासाठी तेथे पोहोचला. त्यानंतर बाळाचा तो हसण्याचा गूढ आवाज बंद झाला. गोविंदा आणि त्याच्या कुटुंबीयांना दिलासा मिळाला. पुन्हा गोविंदाचे कुटुंब ज्योतिष्याकडे गेले व अंधश्रद्धेला खतपाणी घातल्याबद्दल त्यांना चांगलेच फटकारले.