आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Studying Over Listening And He Got Success In UPSC

प्रेरणादायी: एेकूण केलेल्या अभ्यासात त्याने मिळवले युपीएससीत यश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर - संजय सोंधी. वय ४१ वर्षे. दृष्टिहीन असूनही यूपीएससीमध्ये निवड झाली. बिलासपूरच्या यमुनानगरचे ते रहिवासी आहेत. या कलंदराचा प्रवास रोचक व तितकाच प्रेरणादायी आहे. लोकांची उपेक्षा व टोमणे त्यांनी सहन केले आहेत. आज मात्र तीच माणसे त्यांना सलाम ठोकतात. शनिवारी यूपीएससीचे निकाल जाहीर झाले. यात संजय यांना १२१६ वी रँक मिळाली. यापूर्वी त्यांची सीजीपीएससीसाठी निवड झाली होती. त्यांची यशकथा त्यांच्याच शब्दांत...

लहानपणी इतर समवयस्क खेळत असत. मी मात्र बसून राही. खेळावे वाटे मात्र सवंगडी नव्हते. दृष्टिहीन काय खेळणार? शिक्षण कशाला घेणार, असे शब्दही कानावर येत. घरी येऊन हमसून हमसून रडत असे. स्वत:वरच राग काढत होतो. देवावरही राग काढे. आई धीर देत असे. आईच्या धीरामुळेच हुरूप येत होता. आठ वर्षे वयापर्यंत २५ % दिसत होते. त्यानंतर पूर्णपणे अंधत्व आले. एका कवितेने मनाचा ठाव घेतला- कोशीश करने वालों की हार नहीं होती...। बस्स, निश्चय केला.
शाळेतही नेहमी आघाडीवर राहिलो. महाविद्यालयीन शिक्षण घेतले. खासगी शाळेत शिक्षकाची नोकरी केली. २००७ मध्ये सीजीपीएससीमध्ये दृष्टिहीन आशिषसिंह ठाकूर यांची निवड झाली. त्यांच्यापासून प्रेरणा मिळाली. मलाही प्रशासकीय सेवेत यश मिळवण्याची इच्छा होती. परीक्षेची तयारी सुरू केली. स्टडी मटेरियल रेकॉर्ड केले. ते दिवसभर एेकत होतो. या पद्धतीने त्याचे स्मरण करत होतो.
सीजीपीएससी २००८ आणि २०११ मध्ये यश संपादन केले. पीएससी २०११मध्ये राज्यांतून १० वी रँक मिळाली. वय जास्त असल्याने मला उपजिल्हाधिकारी पदापासून दूर राहावे लागले. नायब तहसीलदारपदी नियुक्ती झाली. मी उच्च न्यायालयात अपील केले. तो खटला सुरू आहे. त्यानंतर आयुष्य बदलले. लोकांचा दृष्टिकोनही बदलला. २०११ मध्ये एसएससीच्या माध्यमातून नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफ इंडियाच्या बिलासपूर शाखेत सहायक अधीक्षक म्हणून निवड झाली. राहत्या ठिकाणी जे लोक टोमणे मारत ते आता सलाम ठोकू लागले. अभ्यास सुरू ठेवला. सातत्याने मोबाइलवर रेकॉर्डेड स्टडी मटेरियल एेकत राहिलो. अखेरीस यूपीएससीमध्ये यश प्राप्त झाले.

संजय सोंधींची वाटचाल
>केंद्रशासित प्रदेशात उपजिल्हाधिका-याचे पद मिळण्याची शक्यता.
>रमाकांत सूर्यवंशी दोन वर्षांपासून त्यांना मदत करत आहेत.
>वडील बी.एम. सोंधी यांचे २१ वर्षांपूर्वी निधन, आई संतोष सोंधी यांनी दिले प्रोत्साहन.
>१७० तासांचे स्टडी मटेरियल रेकॉर्ड केले.
>३ विषयांत नेट उत्तीर्ण. अर्थशास्त्र, राज्यशास्त्रात एमए, भोज मुक्त विद्यापीठातून एमबीए उत्तीर्ण.