आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दृष्टिहीन श्रीकांतची कहाणी: जन्मानंतर लोक म्हणाले फेकून द्या, आता आहे 80 कोटींची कंपनी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्लँटवर काम करताना श्रीकांत.
हैदराबाद- हैदराबाद शहराच्या दाटीवाटीच्या वसाहतीच्या मधोमध वसलेली नाचारम औद्योगिक वसाहत. रुंद रस्ते, कंपन्यांचे युनिट कार्यालये, स्वच्छ वातावरण आणि यंत्रांच्या धडधडीचा आवाज. 15 क्रमांकाच्या रस्त्यावरील 28 मध्ये औद्योगिक प्लॉट शेजारी 50 फूट रुंद गेटमध्ये एक उभा ट्रक आणि त्यातून कागदांचे मोठमोठे बंडल उतरवले जात आहेत. 20 हजार फुटांच्या या चार भिंतींच्या आत असलेल्या केबिनमध्ये आपण प्रवेश करतो तेव्हा कामात मग्न झालेला एक सामान्य सडपातळ बांध्याचा पाच फूट उंचीचा एक युवक नजरेस पडतो. तो फोनवर कधी आपल्या व्यवस्थापकाला ऑर्डर लिहायला सांगतो, तर कधी दुसऱ्या ग्राहकाला रक्कम मिळण्याचा कालावधी विचारतो. पाहायला तर तसे हे एखाद्या सामान्य कारखान्यात चालणाऱ्या कामकाजासारखेच दिसते. मात्र, हा काही एखादा सामान्य युवक नाही, तर ते आहेत आपल्या जिद्दीच्या बळावर जगाला नवी दिशा दाखवणारे श्रीकांत बोला! जन्मत:च दृष्टिहीन परंतु त्यांना शिक्षणाची प्रचंड आवड. विज्ञान विषयात 11 वी उत्तीर्ण होणारे ते देशातील पहिलेच दृष्टिहीन आहेत. एवढेच नव्हे, तर ते जगातील सर्वश्रेष्ठ संस्था मॅसॅच्युसेट्सइन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी)मध्ये प्रवेश घेणार पहिले बिगर अमेरिकीही ठरले आहेत.

श्रीकांत एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी ‘रोजगार का शोधता, रोजगार देणारे बना’ ही म्हणही सार्थ करून दाखवली. श्रीकांत सध्या बोलेंट इंडस्ट्रीजचे संस्थापक आणि सीईओ आहेत. त्यांची कंपनी कंझ्युमर फूड पॅकेजिंंग, प्रिंटिंग इंक ग्लूचा व्यापार करते. त्यांच्या पाच प्लँटमध्ये 420 लोकांना थेट रोजगार मिळाला. सहावा प्लँट आंध्र प्रदेशातील श्रीसिटीमध्ये सुरू होत आहे. सहा महिन्यांनंतर हा प्लँट सुरू झाल्यावर 800 हून अधिक लोकांना थेट रोजगार मिळेल. हा झाला थेट रोजगार. परंतु त्यांच्या कंपनीमुळे आठ हजारांहून अधिक लोकांना रोजगार मिळणार आहे. सध्या चार हजारांहून अधिक लोकांना मिळालेला आहे. विशेष म्हणजे कंपनीत श्रीकांतसारख्याच दृष्टिहीन आणि दुर्बल कर्मचाऱ्यांची संख्या 60 ते 70 टक्के आहे. या लोकांबरोबरते स्वत:ही दररोज 15 ते 18 तास काम करतात. हे सर्व करणे म्हणावे तेवढे सोपे नव्हते. ते सांगतात की, आधी दृष्टिहीनांना गणितात 10 वीनंतर प्रवेश मिळत तर होता परंतु विज्ञान शाखेत प्रवेश मिळत नव्हता. त्यामुळे मी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला. मी स्वत: प्रामाणिक होतो म्हणून मला एका प्रामाणिक व्यक्तीची मदतही मिळाली. त्या होत्या माझ्या शिक्षिका सुवर्णलता. न्यायालयाने नोव्हेंबरमध्ये मला विज्ञात शाखेत प्रवेशाची परवानगी दिली. परीक्षा जवळ येऊन ठेपली होती. सुवर्णलता यांनी संपूर्ण नोट्सचा ऑडिओ आपल्या स्वत:च्या आवाजात बनवला आणि मला दिला. परीक्षेत मला 98 टक्के गुण मिळाले. तेथूनच माझी हिम्मत वाढली आणि मी जगातील सर्वश्रेष्ठ संस्थेत शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला.
याबाबत मी जेव्हा लोकांशी चर्चा करायचो तेव्हा ते मला सहानुभूती तर दाखवायचे आणि हो प्रवेश घे म्हणायचे. मात्र मी असे करू शकेन की नाही याबद्दल त्यांच्या मनात कायम संशय असायचा. त्यामुळे एमआयटीत प्रवेश घेण्याचा माझा इरादा आणखीच पक्का झाला. शेवटी मी एमआयटीमध्ये प्रवेश घेतलाच. तेथे 2009 पासून 2013-14 पर्यंत शिक्षण घेऊन पदवीधर झालो. एमआयटीमधून दीर्घ सुटी घेऊन 2012 मध्ये लोकांना सोबत घेऊन माझा व्यवसाय सुरु केला. भांडवल कमी होते. सुवर्णलता यांनी दागिणे गहान ठेवूनम ला पैसे दिले आणि आम्ही सुरुवात केली.
श्रीकांत बुद्धिबळ आणि क्रिकेटसारख्या खेळात दृष्टिहीन गटातील खेळाडू आहेत. ब्रिटन युथ बिझनेस इंटरनॅशनल संघटनेने त्यांना नुकताच बेस्ट सोशल इंटरप्रायजेस ऑफ ग्लोब पुरस्कार दिला. या वर्षीच्या मार्च महिन्यात त्यांना तो युगांडामध्ये प्रदान केला जाईल. बहुअपंगत्व असलेल्या लोकांना प्रशिक्षण देऊन आपल्याकडे नोकरी देण्याची श्रीकांतची योजना आहे. सोबतच झपाट्याने कंपनीचा विस्तार करत असलेल्या श्रीकांत यांचे व्यावसायिक ध्येय्यही मोठे आहे. केवळ तीन वर्षांत हैदराबादेत तीन, निजामाबाद- हुबळीत एक- एक युनिटची स्थापना केली. पुढच्या सहा महिन्यांत श्रीसिटीत निर्यात युनिट सुरु होईल.

अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि युरोपीय देशात उत्पादने निर्यात करण्याची त्यांची योजना आहे. त्यासाठी ते खासगी गुंतवणुकदारांकडून 40 कोटी रुपयेही घेत आहेत. त्यांना पुढील तीन वर्षांत कंपनीची उलाढाल 100 कोटी रुपयांवर न्यायची आहे. शेअर बाजारातही कंपनी लिस्टेड करायची आहे. बोलेंट इंडस्ट्रीजला डिक्सी, सोलो या अमेरिकी कंपन्यांपेक्षाही मोठा ब्रँड बनवण्याचे त्यांचे ध्येय्य आहे.

एपीजे अब्दुल कलाम यांना रोल मॉडेल मानणाऱ्या श्रीकांत यांच्या पुढे पावलो पावली आव्हाने होती. दिव्य मराठी नेटवर्कशी बोलताना ते म्हणाले की, जन्माच्या वेळी दोन एकर शेती असलेल्या शेतकरी आईवडिलांना जन्मत:चा दृष्टिहीन मुलाचे काय करणार? हे पूर्वजन्माचे पाप आहे. त्याला फेकून द्या, असे लोक म्हणाले. मात्र मछलीपट्टणम जिल्ह्यातील सीतारामपुरममध्ये राहणाऱ्या माझ्या आईवडिलांनी माझे पालनपोषण केले. जन्मत: दृष्टिहीनांशी भेदभाव केला जातो. परंतु माझ्या आईवडिलांनी माझी पूर्ण काळजी घेतली.गावात प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर हैदराबादच्या देवनागमधील दृष्टिहीन शाळेत टाकले. तेथे सुवर्णलता शिक्षिका भेटल्या आणि माझ्या जीवनाला कलाटणी मिळाली.

एमआयटीच्या मेकॅनिक इंजिनिअरिंगच्या अधीष्ठातांनी आम्हाला पैसे गोळा करायला मदत केली. आमची भेट रवि मंथा यांच्याशी झाली. हा माझ्या जीवनाला कलाटणी देणारी दुसरी घटना. रविंनी आम्हाला 10 मिनिटांची वेळ दिली होती मात्र चर्चा तास चालली. त्यांनी 30 लाख रुपये कर्ज आणि 35 लाख रुपये भागीदारी म्हणूनही दिले. अशा प्रकारे रवि आमच्या व्यवसायाचे तिसरे भागीदार बनले. कंपनीचे विद्यमान बाजारमूल्य 80 कोटी रुपये आहे. वर्षाअखेरपर्यंत वार्षिक उलाढाल 10 कोटींवर जाईल.