आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुढींनी फाटा देत पतीच्या निधनानंतर राजश्रीची पोलिस दलापर्यंत झेप !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर - समाज, परंपरा आणि रूढींना फाटा देत एका विधवा महिलेने उत्तुंग भरारी घेतली आहे. पती आणि सास-याच्या निधनानंतर अवघ्या परिवाराचे ओझे स्वत:च्या डोक्यावर घेऊन या महिलेने अन्य महिलांसमोर एक आदर्श ठेवला आहे.

डोक्यावर मोठा पदर आणि घरातील परंपरेत अडकलेली राजश्री राजोरिया यांचे सासरे पोलिस दलात कार्यरत होते. पतीचा व्यवसाय होता. सास-यांच्या अकस्मात निधनानंतर पतीला त्यांच्या जागी नोकरी मिळाली; परंतु नियतीला काही वेगळेच मान्य होते. ही नोकरी मिळाल्याच्या काही दिवसांतच पतीचेही एका रस्ता अपघातात निधन झाले आणि राजोरिया कुटुंबावर संकटाचा डोंगर कोसळला. राजोरिया यांच्या समाजात सुनेने नोकरी करणे चालत नाही. त्यामुळे समाज आणि शेजा-यांचा यास विरोध होता. मात्र, हे सर्व विरोध पत्करत राजश्री यांनी दृढनिश्चय केला. पतीच्या जागी पोलिस दलात नोकरी मिळवली आणि मागील सहा महिन्यांत पीटीसीमध्ये प्रशिक्षण पूर्ण केले. शनिवारी पीटीए परेड मैदानावर पोलिस दलाच्या ६८ व्या तुकडीतील ११०२ जवानांचा दीक्षांत समारंभ पार पडला. यात बॅच क्रमांक ३०९ आरेखक राजश्री राजोरिया यांचाही समावेश होता.

राजश्री यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे सासरे रमेशचंद्र राजोरिया हे इंदुरच्या अन्नपूर्णा पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत होते. त्यांचे अकस्मात निधन झाल्यामुळे पती कमलकिशोर यांना अनुकंपा तत्त्वावर संयोगीतागंज पोलिस स्टेशनमध्ये आरेखकाची नोकरी मिळाली; परंतु २०११ मध्ये बदनावर येथे झालेल्या एका रस्ता अपघातात त्यांचे निधन झाले. हा राजोरिया कुटुंबीयांवरील सर्वात मोठा आघात होता. कारण, राजश्री यांचे राहुल आणि राजू हे दोन्ही दीर शिकत होते. सासूची तब्येतही वाईट होती. समाजाचा सुनेने नोकरी करण्यास विरोध होता. मात्र, मुली आणि परिवारासाठी डोक्यावरचा पदर काढून राजश्री यांनी नोकरी करण्याचा संकल्प केला.

अानंदाश्रूत न्हाऊन निघाली
राजश्री यांचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळाल्यानंतर त्यांनी दोन्ही मुलींना घरी ठेवून पीटीसीच्या प्रशिक्षणास जाण्याचा निर्णय घेतला. दीक्षांत समारंभानंतर लहान मुलगी इशिकाला भेटताच राजश्री यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहायला लागले.

मध्य प्रदेश पोलिसांच्या इतिहासातील मोठी परेड
या प्रशिक्षण सत्रात ११०२ प्रशिक्षणार्थी उत्तीर्ण झाले. मध्य प्रदेश पोलिस दलाच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी परेड आहे. राजश्री यांनी या प्रशिक्षणात प्रचंड मेहनत घेतली असे मनिषा पाठक यांनी सांगितले.