आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sukrut Karandikar Blog On Andaman And Nicobar Islands

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

BLOG: रम्य अंदमान-निकोबारला ना लागो ‘मेन लॅंड’ची दृष्ट !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंदमानमध्ये नुकतेच प्रा. शेषराव मोरे यांच्या अध्यक्षतेखाली विश्व साहित्य संमेलन झाले. हे संमेलन कव्हर करण्यासाठी गेलेले 'दिव्य मराठी' चे प्रतिनिधी सुकृत करंदीकर यांनी तेथील वास्तव्यात अनुभवलेले अंदमान शब्दबद्ध केले आहे. वाचा, त्यांच्याच शब्दात...

समुद्रानं ‘मेनलॅंड’पासून तोडलेलं अंदमान-निकोबार देशातलं सर्वात तरुण राज्य. धार्मिक भेदांपासून हा प्रदेश अजून तरी बचावला आहे. “मुस्तफा का भाई चौरासिया,” अशी रक्ताची नाती इथं पावलोपावली दिसतात. पण हे चित्र कधीपर्यंत टिकेल?

बंगालच्या उपसागरातील अंदमान-निकोबार बेटांची माळ भारताचा अविभाज्य भाग आहे, याची कल्पना फार थोडक्यांना आहे. म्हणूनच तर अनेकांच्या अखंड भारत वर्णनाची उडी ‘काश्मिर से कन्याकुमारी तक’ याच्या पुढे जातच नाही. “आम्हाला विसरु नका. ‘काश्मिर से निकोबार तक’ म्हणा” असा आग्रह इथल्या तरुणांना दिल्लीत येऊन धरावा लागतो तो त्यामुळेच. अंदमान-निकोबार भारतात असल्याबद्दलची शंका असली तरी कोलकात्यापासून साडेबाराशे आणि चेन्नईपासून 1190 किलोमीटर सागरी अंतरावर असणारं ‘पोर्ट ब्लेयर’ आणि याच शहरातलं ‘सेल्युलर जेल’ अनेकांना माहिती असतं. सेल्युलर जेलपेक्षाही ‘काळे पाणी’ हा शब्द आठवतोच. अफगाणिस्थानपासून म्यानमारपर्यंत या दोन शब्दांनी कधीकाळी चांगलीच दहशत माजवली होती. वास्तविक अंदमान-निकोबार द्वीप समुहाभोवतीचा समुद्र नितळ निळा आणि कमालीचा सुंदर आहे. ‘येथे येणारा जिवंत परतत नसतो,’ हा लौकिक ब्रिटीशांच्या जुलमी सत्तेने रुजवला आणि ‘काळ्या पाण्या’ची भीती वाक्यप्रचारच बनून गेली. इंग्लंडमधल्या राजकीय कैद्यांना, गुन्हेगारांना ब्रिटीश सत्ताधीर ऑस्ट्रेलियात नेऊन सोडत. त्याचप्रमाणं ‘युनियन जॅक’ला आव्हान देणाऱ्या भारतीय क्रांतीवीरांना आणि येथील इतर गुन्हेगारांना भारतापासून तोडण्यासाठी ‘काळ्या पाण्या’वर धाडण्याची सुरुवात ब्रिटीशांनी केली.

ब्रिटीशांच्याआधी दक्षिणेतल्या राजांनी अंदमान-निकोबारवर सत्ता गाजवल्याचे दाखले दिले जातात. ‘अंदमान’चा संदर्भ तर थेट रामायणातील हनुमानाशी जोडतात. हनुमानचे ‘हन्दुमान’ आणि पुढे ‘अंदमान’ झाले. निकोबारचा इतिहास चौल राजवटीपर्यंत मागे नेला जातो. चौलांच्या अधिपत्याखाली ‘नक्कवरम’ नावानं ओळखली जाणारी बेटं कालौघात निकोबार झाली. स्थानिकांकडून ऐकायला मिळालेली अंदमान-निकोबार या नावाची उत्पत्ती अशी आहे. मधल्या कालखंडात ही बेटं दुर्लक्षित होती. ब्रिटीशांमुळं येथील राबता वाढला. ब्रिटीशांची जहाजं या बेटांना लागली तेव्हा त्यांना अंदमानी, ओंगी, जारवा, सेंटिनलीज, निकोबारी, शॉंपेन या आदीम-आदिवासींचा सामना करावा लागला. आदिवासींचे भाले-बाण ब्रिटीशांच्या तोफा-बंदुकांपुढे टिकण्याची सुतराम शक्यता नव्हतीच. ब्रिटीशांनी त्यांना हव्या असलेल्या बेटांवरुन आदिवासींना सहज हुसकावून लावलं. ब्रिटीशांच्या सेवेसाठी ‘मेनलॅंड’हून भारतीय मजुरांची आयात सुरु झाली. सन 1857 च्या स्वातंत्र्यलढ्यानं ब्रिटीशांना मुळापासून हादरवलं. हा वणवा त्यांनी क्रुरपणं विझवला. त्यांनी या लढ्यातल्या दोनशे स्वातंत्र्यसैनिकांची पहिली तुकडी 10 मार्च 1858 या दिवशी अंदमानात आणली. ‘काळ्या पाण्या’ची हिंदुस्थानला बसलेली ही पहिली दहशत होती. पुढे जाऊन काळ्या पाण्याची शिक्षा स्वातंत्र्यसैनिकांच्या अपार देशभक्तीची परिसीमा बनली ही बाब अलहिदा. कैद्यांची संख्या वाढू लागल्यानं ब्रिटीशांनी आठशे कैद्यांना कोंडून ठेवणाऱ्या भल्यामोठ्या जेलचं बांधकाम हाती घेतलं. सन 1906 मध्ये ते पूर्ण झालं. हाच तो सेल्युलर जेल. भारतीय उपखंडात ब्रिटीशांची सत्ता असलेल्या सर्व प्रांतातले गुन्हेगार काळ्या पाण्यावर पाठवले जात. त्यांना याच जेलमध्ये ठेवत असत.

अंदमान-निकोबार द्वीप समुहातल्या बेटांची एकूण संख्या 572 आहे. या सगळ्यांचं आकारमान औरंगाबाद जिल्ह्यापेक्षा थोडं कमी म्हणजे सव्वाआठ हजार चौरस किलोमीटर एवढं आहे. यातल्या फक्त 37 बेटांवर वस्ती आहे. जेमतेम चार लाख लोक आज येथं राहतात. यात मूळ आदिवासींची संख्या 27 हजार. तिन्ही सैन्यदलं, बॅंका, सरकारी कार्यालयं, व्यापारी जलवाहतूक आदींच्या निमित्तानं अंदमान-निकोबारातल्या अस्थायी लोकसंख्येचं (फ्लोटिंग पॉप्युलेशन) प्रमाण लक्षणीय आहे. स्थानिकांशी बोलताना ‘हमारे परदादा यहॉं कैदी थे’, असं उत्तर अनेकांकडून ऐकायला मिळतं. काळ्या पाण्याच्या शिक्षेवर आलेल्यांचे वारस मोठ्या संख्येने इथं आहेत. लोकसंख्येचा दुसरा मोठा घटक आहे माजी सैनिकांच्या वारसांचा. अंदमान-निकोबार बेटांच्या लष्करी महत्त्वामुळं स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने जाणीवपूर्वक इथली वस्ती वाढवली. अकरा एकर जमीन, घर, साधनं देऊन अंदमान-निकोबारात स्थायिक होण्याचा पर्याय निवृत्त सैनिकांना दिला गेला. त्याला प्रतिसाद देत देशभरातून सैनिक इथं आले. अंदमानातली मराठी कुटूंबं अशाच माजी सैनिकांची आहेत. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातली 50-60 कुटूंबं सन 1974 मध्ये इथे आली. त्यातली 34-35 कुटुंबं आजअखेरपर्यंत तगली आहेत. अंदमानातलं कायमस्वरुपी मराठी जग एवढ्यापुरतंच मर्यादीत आहे.

जे मराठी कुटुंबांचे तेच इतर प्रदेशातल्या माजी सैनिकांचं. कानडी, तामिळ, तेलुगू, बंगाली, आसामी, बिहारी, पंजाबी असे सगळीकडून लोक अंदमान-निकोबारमध्ये आले. भौगौलिक जवळीकतेमुळं बंगाली आणि दाक्षिणात्यांचं प्रमाण साहजिकच जास्त असलं तरी अंदमान-निकोबारची खरी ओळख ‘छोटा भारत’ हीच आहे. या भारताची सार्वजनिक भाषा हिंदी आणि इंग्रजी. ‘मेनलॅंड’लाही हेवा वाटावा अशी अनुकरणीय बाब अंदमान-निकोबारात आहे. ती म्हणजे सामाजिक समरसता. प्रादेशिक, धार्मिक आणि जातीय भेदांच्या ओंगळवाण्या स्पर्शाने इथली संस्कृती अजून विटाळलेली नाही. अनेकांचे पूर्वज कैदी म्हणून आले. 1860 नंतर महिला कैद्यांनाही ब्रिटीशांनी ‘काळ्या पाण्या’वर धाडलं. शिक्षा भोगून झालेेल्या स्त्री-पुरुषांची लग्नं तुरुंगात लावून देण्याची पद्धत ब्रिटीशांनी सुरु केली. कैदी स्त्री आणि कैदी पुरुष...त्यावेळी धर्म, प्रांत विचारण्याच्या प्रश्नच येत नसे. पुर्वाश्रमीच्या कैदी जोडप्यांना अंदमानातच स्थायीक होण्यास ब्रिटीश भाग पाडत. कारण सेवेसाठी त्यांना मनुष्यबळ हवं होतं.

ब्रिटीश माघारी गेल्यानंतर इथं पसंतीनं लग्नं होऊ लागली. पण तोवरच्या ऐंशी वर्षांत पुरती सरमिसळ होऊन गेली होती. त्यामुळे ब्रिटीश गेल्यानंतरही फक्त ‘मुलगा आणि मुलगी’ याच निकषावर लग्ने लावण्याची पद्धत टिकून राहिली. समुद्राच्या मध्यात असलेल्या या बेटांवर अतिवृष्टी, चक्रीवादळे, भूकंप अशा न संपणाऱ्या नैसर्गिक संकटांची छाया सतत असते. या स्थितीत जगताता माणसाला धरुन राहणे, ही इथली प्राथमिक गरज आहे. 2004 च्या त्सुनामीनं यांच्या मनांना कायमची धास्ती बसली. या बेटांवर बाहेरुन येऊन सहसा कोणी स्थिरावत नाही आणि स्थानिकांमधले उच्चशिक्षित इथं थांबत नाहीत. चांगली अार्थिक स्थिती, शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले तरुण-तरुणी पुढच्या आयुष्यासाठी बाहेर पडतात. परिणामी लोकसंख्या मर्यादीत. स्वजातीय, स्वधर्मीय वधु-वरांच्या जोड्या जमवायच्या कशा? सून मुस्लिम, जावई ख्रिश्चन, सासरे हिंदू, सासू बहाई असे सगे-सोयरे येथील घराघरांमध्ये नांदताहेत. बंगाली, मराठी, पंजाबी, दाक्षिणात्य असा प्रांतभेद करण्याचीही मुभा इथल्या परिस्थितीनं दिलेली नाही. मंदिर, मशिद, बुद्धविहार, चर्च अंदमानात आहेतच. पण घरात एकच धर्म पाळण्याची सवय स्थानिकांना नाही. ‘मेन लॅंड’वरच्या जातीय-धार्मिक तणाव, विद्वेषापासून अंदमान अजूनही दूर आहे. एकमेकांच्या सणावारात, उत्सवांमध्ये सगळे सहभागी होतात ते घरचा सण म्हणून. उगाचच सर्वधर्मसमभाव किंवा तत्सम बोज़ड अट्टाहासापायी नव्हे. स्वतःच्या नात्यांमध्ये सगळ्याच जाती-धर्माची माणसे असल्याने जातीय-धार्मिक भावना टोकदार झालेल्या नाहीत.

हे सुखद चित्र कधीपर्यंत टिकणार याची मात्र शाश्वती नाही. ब्रॉडबॅंड इंटरनेट आणि डिश टीव्हीच्या माध्यमातून ‘मेन लॅंड’च नव्हे तर जगभरातली विकृती अंदमानच्या सुशेगात वातावरणात वेगानं घुसू लागली आहे. तात्पुरत्या कालावधीसाठी 'मेन लॅंड'हून अंदमानात येणारी मंडळी त्यांना चिकटलेल्या सर्व वाईट-साईट कल्पना घेऊनच येतात. त्याचा संसर्ग स्थानिकांना कमी-अधिक प्रमाणात होतोच. या सगळ्यांमुळं होतय काय की विकास, प्रगती आणि माणूसपणाच्या व्याख्याच हळुहळू बदलू लागल्यात. पर्यटन विकासाच्या नावाखाली इथल्या बेटांवर पंचतारांकीत हॉटेलं उभी करण्याचे मनसुबे रचले जात आहेत. त्यापाठोपाठ कॅसिनो, मद्यालयं, वेश्यालयांची भरमार इथं होण्याची चिन्हं आहेत. अंदमानातच जन्मलेल्या आणि वाढलेल्या लोकांना –

“आगे बढते बढते, दरारे बनती गयी

सभ्य बनते गये, दरारे बढती गयी!”

हे भविष्य दूरवर दिसू लागलयं. अंदमान-निकोबारच काळ्या पाण्याच्या शिक्षेवर जाण्याच्या सावटाखाली आहे. भेदांच्या भिंती आणि विकासाच्या कल्पनांचे काळे ढग इथल्या रम्य वातावरणावर झडप घालण्याच्या बेतात आहेत.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, अंदमान बेटावरील रम्य निळाई आणि आणखी फोटो...