नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाची इमारत स्फोटाने उडवून देण्याचे धमकी सर्वोच्च मिळाली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे न्यायालय परिसरातील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तसेच परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर तपासही सुरू करण्यात आला आहे. गेल्या आठवड्याच्या अखेरीस यासंदर्भातील इ मेल मिळाला असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव लॉच्या विद्यार्थ्यांनाही कोर्टरूममध्ये प्रवेश नाकारण्यात आला आहे.
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला जस्टीस दीपक मिश्रा यांनाही धमकी देण्यात आली होती. मुंबई साखळी स्फोटातील आरोपी याकूबच्या फाशीला स्थगिती देणा-या बेंचचे मिश्रा हे सदस्य होते. दिल्लीतील घराच्या मागच्या बाजुला एका सुरक्षारक्षकाला हे धमकीचे पत्र सापडले होते. त्यानंतर याकूबबाबत निर्णय देणा-या सर्व न्यायाधीशांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे.
अशा प्रकारच्या धमक्यांचा कसा निपटारा करायचा, हे माहिती असल्याचे जस्टीस दीपक मिश्रा आणि सरन्यायाधीश एचएल दत्तू यांनी म्हटले आहे. आमचे काम खटल्यांचा योग्य निकाल देणे हे आहे, आणि आम्ही कोणतीही भीती न बाळगता ते करतो असे या न्यायाधीशांनी म्हटले आहे.
लॉच्या विद्यार्थ्यांना नो एंट्री
या इ-मेलचा तपास सुरू असून तो कोणी पाठवला याबाबत अद्याप काहीही माहिती मिळालेली नाही. दरम्यान, सुरक्षेच्या दृष्टीने सुप्रीम कोर्टात अनेक पावले उचलली जात आहेत. लॉच्या विद्यार्थ्यांनाही सुरक्षेच्या कारणास्तव कोर्टरूममध्ये प्रवेश नाकारण्यात आला असल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. तसेच वकिलांना खटल्याच्या संदर्भात भेटण्यासाठी आलेल्या क्लाइटंसनाही पास जारी करण्यात आले नसल्याची माहिती मिळत आहे.
पुढील स्लाइडवर पाहा, संबंधित PHOTO