आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोरखपूरमध्ये मुलांच्या मृत्यूप्रकरणी सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार; मानवाधिकारांची नोटीस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - गोरखपूरच्या बाबा राघव दास (बीआरडी) वैद्यकीय महाविद्यालयात मुलांच्या मृत्यूची दखल घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला.  मुख्य न्या. जे. एस. खेहर यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने एसआयटीकडून चौकशी व्हावी, अशी मागणी करणाऱ्या विधिज्ञास अलाहाबाद उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला. 
 
मुख्यमंत्री योगी स्वत: परिस्थिती हाताळत आहेत, असे पीठाने स्पष्ट केले. दरम्यान,  राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने उत्तर प्रदेश सरकारला नोटीस पाठवून चार आठवड्यांत या घटनेचा अहवाल मागितला आहे. सरकार आणि आरोग्य विभागाच्या उदासीनतेचा हा परिणाम असल्याचे अायोगाने म्हटले आहे.  
 
अमित शहा म्हणाले, मुले मेली आहेत, अाता धूमधडाक्यात जन्माष्टमी साजरी करा, असे तर योगींनी म्हटले नाही ना!  
 मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांनी  शांततेत आणि भव्य प्रमाणात जन्माष्टमी साजरी करावी, असे अादेश पोलिसांना दिले आहेत. श्रीकृष्णाचा जन्म तुरुंगात झाला. यामुळे उत्तर प्रदेशात पोलिस जन्माष्टमी साजरी करतात. परंतु या आदेशानंतर वादंग निर्माण झाले आहे. यावर भाजप अध्यक्ष अमित शहा यांना बंगळुरूमध्ये प्रश्न विचारण्यात आली. त्यांची उत्तरे...  
 
प्रश्‍न- गोरखपूरमध्ये ६० हून जास्त मुलांचा मृत्यू झाला. पण यात दोष कोणाचा?  हे सरकारकडून सांगण्यात आले नाही. 
आम्ही काँग्रेस करते तसे विनाचौकशी कोणावरही दोष लादत नाही. मुख्यमंत्र्यांनी कालबद्ध चौकशीचे आदेश दिले आहेत. अहवाल येताच तो सार्वजनिक केला जाईल. ही दुर्घटना आहे. चूक कोणत्या स्तरावर झाली, त्यावरून गरिबाच्या विकासाची आमची भूमिका नाकारता येणार नाही,हेही तितकेच खरे.  
 
प्रश्‍न- मृत्यू झाले असताना सीएमनी जन्माष्टमी धूमधडाक्यात साजरी करण्याचे आदेश दिले. ही असंवेदनशीलता नाही काय?  
मुलांच्या मृत्यूचे दु:ख सगळ्यांनाच आहे. परंतु जन्माष्टमी ही वेगळी बाब आहे. मुले मेली आहेत, आता धूमधडाक्यात जन्माष्टमी साजरी करा!  असे तर योगी म्हणाले नाहीत ना! देशात होते तशी जन्माष्टमी उत्तर प्रदेशातही लोक भक्तिभावाने साजरी करतील. कोणी घरात उत्सव साजरा केला तर सरकार काय करणार?  
 
प्रश्‍न- विरोधी पक्षांकडून मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी होत अाहे. ही जबाबदारी डॉक्टरांचीच नव्हे सरकारची आहे. 
हे पाहा,  मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागणे हे काँग्रेसचे कामच आहे. ही दुर्घटना आहे. देशात याआधीही अनेक मोठ्या दुर्घटना झाल्या आहेत. ही पहिलीच घटना नव्हे. काँग्रेस सरकारच्या काळातही अशा प्रकारच्या दुर्घटना घडल्या आहेत. त्या काळात अशा दुर्घटना होत नव्हत्या असे काही नाही. याची चौकशी सुरू आहे.
 
 
बातम्या आणखी आहेत...