आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sushma Swaraj News In Marathi, Reddy Brothers, Karnatka, BJP

रेड्डी बंधू, शर्मा यांच्या प्रवेशाला सुषमा स्वराज यांचा रेड सिग्नल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू/ चंदीगड - कर्नाटकच्या खाण घोटाळ्यातील आरोपी रेड्डी बंधू आणि हरियाणामधील काँग्रेस नेते विनोद शर्मा यांच्या भाजप प्रवेशाला विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी जोरदार विरोध दर्शवला आहे. ट्विटरवरून सुषमा यांनी त्यांच्या प्रवेशाला आपला आक्षेप घेतला आहे.


अंबालाचे आमदार विनोद शर्मा यांनी बुधवारी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला. माझा शर्मा यांच्या प्रवेशाला विरोध आहे. तसे मी पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांना कळवले आहे, असे स्वराज यांनी ट्विट करून जाहीर केले. शर्मा हे जेसिका लाल हत्याकांडातील आरोपी मनू शर्मा याचे वडील आहेत. हत्याकांडात मनू शर्माला दुस-यांदा अटक झाल्यानंतर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. हत्यांकाडाशी संबंधित व्यक्तीला पक्षात प्रवेश नको, अशी भूमिका स्वराज यांनी घेतल्याचे सांगितले जाते. दुसरीकडे सोनिया गांधी यांना आपण राजीनामा पाठवल्याचे शर्मा यांनी स्पष्ट केले. पक्षातील काही घडामोडीवरून आपण नाराज असल्याचे सांगून राजीनामा दिला होता. त्यानंतर शर्मा भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा सुरू झाली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना स्वराज यांनी ट्विटरवर शर्मा यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जाऊ नये, असे मत मांडले. दरम्यान, माजी केंद्रीय मंत्री आणि हरियाणातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून शर्मा यांचे राज्यात चांगले वजन आहे. त्याशिवाय मुख्यमंत्री भूपेंदर सिंग हुÞडा यांच्या निकटवर्तीयापैकी मानले जातात. शर्मा यांच्या मालकीचा हॉटेलचा साखळी उद्योग आणि काही टीव्ही वाहिन्याही आहेत. अद्याप काहीही निर्णय घेतला नसल्याचे शर्मा यांनी स्पष्ट केले असले तरी 9 मार्च रोजी ते कुलदीप बिष्णोई यांच्या हरियाणा जनहित काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जाते.


अगोदर पाठिंबा, नंतर विरोध
कर्नाटकमधील बीएसआर काँग्रेसच्या भाजपमधील विलीनीकरणाचा प्रस्ताव चर्चेत असतानाच स्वराज यांनी त्याला ट्विट करून विरोध केला. बेल्लारीतील खाणसम्राट असलेले बी. श्रीरामलू आणि रेड्डी बंधूंच्या प्रवेशाला स्वराज यांनी जोरदार विरोध दर्शवला. राजनाथ सिंह यांना पत्र लिहून त्यांनी ही भूमिका मांडली. रेड्डी बंधू कलंकित असल्याचा ठपका ठेवून सुषमा यांनी कर्नाटकातील बीएसआर काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरण किंवा आघाडीला आणि पूर्वाश्रमीच्या भाजप नेत्यांना पुन्हा पक्षात घेण्यास विरोध केला आहे. दरम्यान, जनार्दन, करुणाकरा, सोमशेकरा हे रेड्डी बंधू नेहमीच सुषमांच्या निकटवर्तीयांपैकी मानले जात, परंतु त्याचा केंद्रीय नेतृत्वाला विसर पडल्याचे सांगितले जाते.


पुरंदेश्वरी भाजपच्या वाटेवर
काँग्रेस नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री डी. पुरंदेश्वरी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. पुरंदेश्वरी यांनी गुरुवारी आपल्या समर्थकांची भेट घेऊन तशी इच्छा व्यक्त केली आहे. त्या शुक्रवारी भाजप नेतृत्वाची भेट घेतील. दिल्लीत जाऊन अडवाणी, सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे काँग्रेसला सीमांध्रमध्ये चांगलाच धक्का बसला आहे.


रेड्डींच्या बचावासाठी पुढाकार!
जी. जनार्दन रेड्डी आणि त्यांच्या दोन बंधूंच्या ओबलपुरम खाण कंपनीला 2004 मध्ये परवाना मिळाला होता. 2009 मध्ये कोट्यवधींचा घोटाळा उघड झाल्यानंतर सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विशेष समिती स्थापन करण्यात आली होती. त्यावेळी रेड्डी बंधू मंत्रिमंडळात होते. त्यांच्यावर सीबीआयकडून गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतरही सुषमा स्वराज यांनी कर्नाटकातील या श्रीमंत राजकीय नेत्यांची पाठराखण केली होती. त्यांना मंत्रिमंडळातून काढू नये, यासाठी त्यांनी आपले वजन वापरले होते. परंतु या प्रकरणात तिघांना अटक झाली. त्यानंतर भाजपने रेड्डी बंधूसह बी. एस. येदीयुरप्पा यांना पदावरून हटवले होते. परंतु नंतरच्या काळात स्वराज यांनी रेड्डी यांच्यापासून अंतर ठेवण्यास सुरुवात केली.


कुख्यात मनू शर्माची वडील
1999 मध्ये मॉडेल जेसिका लालची हत्या झाली होती. त्यात सिद्धार्थ वशिष्ठ अर्थात मनू शर्मा हा दोषी ठरला होता. तो सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. मनू शर्मा विनोद शर्मा यांचा मुलगा आहे. तेव्हा विनोद शर्मा त्यावेळी विधान परिषदेवर होते. त्या अगोदर काँग्रेसकडून राज्यसभा सदस्य होते. त्यांचे काका माजी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्माचे यांचे जावई होत. कलंकित पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला भाजपमध्ये प्रवेश मिळाला तर त्याचा आगामी निवडणुकीत पक्षाला फटका बसू शकले, असा स्वराज यांचा होरा आहे. त्यामुळे स्वराज यांनी जाहीरपणे शर्मा यांच्या प्रवेशाला विरोध दर्शवला.