आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय वर, पाक वधू; लग्नात तणावाचे विघ्न! कुटुंबीयांना अद्याप व्हिसाच मंजूर नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर - येथील रहिवासी नरेश तेवाणी आणि त्याची कराचीची वाग्दत्त वधू प्रिया बच्चाणी यांचा विवाह ठरला खरा, परंतु सीमेवरील तणावामुळे त्यात विघ्न आले आहे. तेवाणी आणि बच्चाणी कुटुंबाने महिनाभरानंतर लग्नाचा बार उडवून देण्याचे ठरवले. मात्र, भारत-पाकिस्तान सीमेवरील सध्याच्या तणावामुळे लग्नघटिका लांबते की काय, अशी चिंता दोन्ही कुटुंबांना सतावू लागली.

पाकिस्तानमधील भारतीय वकिलातीने वधूच्या कुटुंबीयांना लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी अद्याप व्हिसा मंजूर केला नाही. यातून मार्ग काढण्यासाठी अखेर स्वत: वराने परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे मदतीसाठी साकडे घातले आहे. स्वराज यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याचे तत्काळ आश्वासन दिल्याने दोन्ही कुटुंबांत पुन्हा उत्साह संचारला आहे.

वर नरेशनुसार व्हिसासाठी नियमानुसार वेळेत अर्ज करूनही वधूच्या कुटुंबातील एकाही सदस्याला व्हिसा जारी झाला नाही. व्हिसाबाबत काहीच हालचाली होत नसल्याचे पाहून परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे मदत मागितली होती. स्वराज यांनी शनिवारी आपल्या विनंतीची दखल घेत व्हिसा जारी करण्याचे आश्वासन दिले.
पाकिस्तानची सून करण्याचे २००१ मध्येच ठरवले
वराचेवडील कन्हैयालाल म्हणाले, २००१ मध्ये मी पाकला गेलो होतो. तेव्हापासून सून तेथीलच करायची, असे ठरवले. दोन्ही देशांची संस्कृती आणि परंपरांच्या समान धाग्याचे रेशीमगाठीत रूपांतर करण्याची इच्छा होती. मात्र, हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी आणखी वाट पाहावी लागते की काय, अशी भीती आम्हाला होती.

व्हिसासाठी तीन महिन्यांपूर्वी अर्ज
परराष्ट्रमंत्र्यांनी केलेल्या टि्वटमध्ये म्हटले की, कृपया काळजी करू नका, आम्ही व्हिसा जारी करू. तेवाणी म्हणाले, वधूपक्षाच्या लोकांनी व्हिसासाठी तीन महिन्यांपूर्वीच अर्ज केला होता. व्हिसा वेळेत मंजूर होईल, असे आम्हाला वाटले होते. काहीही करून कराचीच्या पाहुण्यांना व्हिसा मिळावा यासाठी प्रयत्न सुरू होते. त्यात उशीर होत गेल्याने लग्नाच्या तयारीवरही त्याचा परिणाम झाला. परराष्ट्रमंत्री अडचणीतील नागरिकांना टि्वटरवर प्रतिसाद देत असल्याचे माहीत होते. त्यामुळे आम्ही टि्वटरवर त्यांना विनंती केली.
बातम्या आणखी आहेत...