आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अण्णाद्रमुकमधून शशिकला बडतर्फ, नियुक्त्याही रद्द; पक्ष संस्थापक पदाला पर्यायी पद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई- अण्णाद्रमुकच्या सर्वोच्च मंडळाने महासचिव व्ही. के. शशिकला यांना पक्षातून बडतर्फ केले आहे. त्यांनी पक्षात केलेल्या विविध नियुक्त्याही रद्द ठरवण्यात आल्या आहेत. पक्षाच्या सर्वसाधारण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ३० डिसेंबर २०१६ ते १५ फेब्रुवारी २०१७ पर्यंत पक्षांतर्गत शशिकला यांनी घेतलेले निर्णय आणि नियुक्त्या अवैध ठरवण्यात आल्या आहेत. १५ फेब्रुवारी रोजी बंगळुरू न्यायालयाने त्यांची रवानगी तुरुंगात केली होती.  शशिकला यांचे भाचे दिनकरन यांची नियुक्तीही यानंतर रद्द झाली असल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. २९ डिसेंबर रोजी अण्णाद्रमुकच्या महासचिवपदी शशिकला यांची नियुक्ती झाली होती. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी दोषी ठरवले होते. १५ फेब्रुवारीला त्यांनी बंगळुरू न्यायालयात समर्पण केले होते.  

२१ ऑगस्टपासूनच पक्षाअंतर्गत शशिकला यांना बडतर्फ करण्याच्या प्रक्रियेला वेग आला होता. टी.टी.व्ही. दिनकरन यांच्या गटातील १९ आमदारांनी तामिळनाडूचे राज्यपाल सी.एच. विद्यासागर राव यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्र्यांविरुद्ध अविश्वास ठराव आणण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर पलानीस्वामी आणि पन्नीरसेल्वम गटाने शशिकला यांच्या बडतर्फीच्या प्रक्रियेला वेग दिला. तुरुंगात जाण्यापूर्वी दिनकरन यांना आपल्या सचिवपदी शशिकला यांनीच नियुक्त केले होते. शशिकला यांचा नातलग एस. व्यंकटेश यांनाही पद देण्यात आले होते. वर्ष २०११ मध्ये शशिकला यांनी दिनकरन, व्यंकटेश यांना पक्षात नियुक्त केल्यानंतर तत्कालीन पक्षप्रमुख व मुख्यमंत्री जे. जयललिता यांनी या दोघांनाही पक्षातून बडतर्फ केले होते, हे विशेष.  

पक्षाचे महासचिव पद केवळ जयललितांकडेच राहणार 
दिवंगत नेत्या जे. जयललिता याच अण्णाद्रमुकच्या महासचिव राहतील. या पदासाठी एकही सदस्य पात्र नसल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. याशिवाय पर्यायी पदांची निर्मिती करण्यात आली आहे. पक्ष संस्थापक एम.जी. रामचंद्रन आणि महासचिव जे. जयललिता यांच्या मृत्यूनंतर त्यांची पदे अबाधित ठेवण्यात येतील, असे सांगण्यात आले आहे. या बैठकीला पलानीस्वामी, पन्नीरसेल्वम, इ. मधुसूदन यांची प्रमुख उपस्थिती होती.  

मंगळवारच्या बैठकीत दोन नव्या पदांची निर्मिती  
अण्णाद्रमुकच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत दोन नव्या पदांची निर्मिती करण्यात आली आहे. समन्वयक, संयुक्त समन्वयक अशी ही नवी पदे आहेत. पक्षाच्या कारभारासाठी ही पदे महत्त्वाची आहेत. उपमुख्यमंत्री आे. पन्नीरसेल्वम आणि मुख्यमंत्री के. पलानीस्वामी हे अनुक्रमे समन्वयक आणि संयुक्त समन्वयक असतील. पक्षांतर्गत या पदासाठी भविष्यात मतदान होईल.
बातम्या आणखी आहेत...