आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Take Action Against Robert Vadra, Election Commission Said To PM Modi

दामादजींच्या जमीन व्यवहाराची दखल घ्या, पंतप्रधान मोदींचे निवडणूक आयोगाला आवाहन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिसार (हरियाणा) - सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा व डीएलएफ कंपनीने केलेल्या भूखंड खरेदी व्यवहाराला हरियाणाचे मुख्यमंत्री भूपेंदरसिंह हुडा यांनी दिलेल्या मंजुरीबद्दल निवडणूक आयोगाने गांभीर्याने विचार करायला हवा. राज्य विधानसभा निवडणुकीत पराभव समोर दिसत असल्याने हुडा यांनी घाईघाइईने हा निर्णय घेतला असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केला.

१५ ऑक्टोबरला महाराष्ट्रासोबतच हरियाणातही विधानसभेसाठी मतदान होत असून यानिमित्त आयोजित जाहीर सभेत मोदींनी हुडा व वढेरा यांच्यावर जोरदार टीका केली. निवडणुकीनंतर दामादजींच्या (वढेरा) या व्यवहाराला कोणत्याही परिस्थितीत मंजुरी मिळणार नाही, याची खात्री असल्यानेच हुडा यांच्यावर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी दबाव आणला असावा, अशी शक्यताही मोदींनी बोलून दाखवली.

या भूखंड व्यवहाराची निवडणूक आयोग गंभीर दखल घेईल, अशी अपेक्षा मोदींनी व्यक्त केली. वढेरा यांनी केलेला भूखंडांचा व्यवहार राज्याचे माजी महासंचालक अशोक खेमका यांनी अवैध ठरवला होता. तो हुडा सरकारने पुन्हा वैध ठरवणे म्हणजे निवडणुकीआधीच काँग्रेसने पराभव मान्य केला असल्याचे मोदी म्हणाले.

चौटालांवरही टीका
सध्या तुरुंगात असलेले माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटालांवरही मोदींनी टीका केली. काही लोक तुरुंगात राहून मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचे स्वप्न पाहत आहेत.
ही मंडळी माझ्यासोबत असलेली जुनी छायाचित्रे प्रसिद्ध करून भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत असली तरी मला तुरुंगातून कुणाच्या पाठिंब्याची गरज नाही, असे मोदींनी ठासून सांगितले.

वढेरांना एक इंचही जमीन दिली नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आरोप मुख्यमंत्री हुडा यांनी स्पष्टपणे फेटाळले. तीन बिघाच काय, तीन इंच जमीनही वढेरा यांना राज्य सरकारने दिली नसल्याचा दावा त्यांनी केला. आरोप सिद्ध करून दाखवले तर आपण राजीनामा देण्यास तयार आहोत, असेही त्यांनी नमूद केले.