नोएडा / मेरठ - सहा दिवसांपासून बेपत्ता झालेल्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील दोन विद्यार्थ्यांचे मृतदेह गाझियाबादच्या डसना मसुरी कालव्यात सापडले. पोलिसांनी नोएडाच्या सेक्टर - ६३ मधील एका मदरशाचा शिक्षक अय्युब यास अटक केली आहे.
अय्युब याने या दोन विद्यार्थ्यांच्या हत्येसाठी दहा लाखांची सुपारी घेतली होती. शहरातील एक ऑटोचालक हैदर याने ही सुपारी दिली होती. पोलिसांचा तपास भटकावा या उद्देशाने हैदर याने या विद्यार्थ्यांच्या पालकांकडे फाेन करून दीड कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. हैदर अद्याप फरार अाहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अय्युब ताईत तयार करत होता. बाबर नावाच्या तरुणाने एका तरुणीस वश करून घेण्यासाठी ताईत तयार करण्यास सांगितले होते. दरम्यान, ऑटोचालक हैदर अय्युबला भेटला. त्याने बाबर आणि सद्दाम त्याच्या प्रेयसीला त्रास देत असल्याचे म्हटले.
हैदरने या दोघांचा काटा काढण्यासाठी अय्युबकडे १० लाख रुपये मागितले. योजनेनुसार १० एप्रिल रोजी अय्युबने बाबर आणि सद्दाम या दोघांना नोएडा येथील मदरशात बोलावले. त्यानंतर दोघांना बेशुद्ध केले आणि त्यानंतर बेहोश अवस्थेतच त्यांचा गळा दाबून खून केला.