आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झारखंडमधील ४० हजार शिक्षक संपावर, गावातील २८ मुलांनी शिकवले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पलामू (झारखंड)- झारखंडमध्ये ४० हजार अर्धवेळ शिक्षक ३८ दिवसांपासून संपावर आहेत. संप कुठपर्यंत लांबणार हे काहीच सांगता येत नाही. संपामुळे राज्यातील १७ हजार प्राथमिक माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालयातील १५ लाख विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे.

मात्र, संपूर्ण राज्यात एका ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्व नऊ शाळांमधील शिक्षक संपावर असूनदेखील सर्व वर्ग नियमित सुरू आहेत. पलामू जिल्ह्यातील बघमनवा गावात हे सुखद चित्र दिसते. संप सुरू झाल्यानंतर नऊ गावातील २८ तरुण-तरुणींनी या शाळांतील १३०० विद्यार्थ्यांना शिकवण्याचा निर्णय घेतला. सर्व जण संप संपेपर्यंत मोफत शिक्षण देणार आहेत. सरपंच रवींद्र उपाध्याय यांच्या प्रयत्नानंतर तरुण वर्ग अध्यापन कार्यासाठी तयार झाला. १६ सप्टेंबर रोजी संपाची घोषणा झाल्यानंतर मुलांच्या अभ्यासावर परिणाम होईल,अशी भीती होती. सहकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर बेरोजगार तरुणांची मदत घेण्यात आली. ग्रामपंचायतीमध्ये त्याबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.त्याच दिवशी सायंकाळपर्यंत २८ जणांनी संमती दर्शवली.

गौरा विद्यालयात शिकवणारा मनोज पाल म्हणाला, मुलांना शिकवण्याबाबत विचारणा करण्यात आली तेव्हा आता नाही शिकवले तर शिक्षणाचा उपयोग काय,असा विचार आला. एमए करणारी दुर्गावती म्हणाली, घरी रिकामे बसण्यापेक्षा एखादे काम करणे चांगले. त्यामुळे शिकवण्याचा निर्णय घेतला.

स्पर्धा परीक्षांची तयारी करणारा राजू राम न्यू प्राथमिक शाळेतील बारावीच्या विद्यार्थ्यांना शिकवत आहे. राजू म्हणाला, कोणत्याही इयत्तेतील शिक्षण असो ते भविष्यात उपयोगी पडतेच. मुलांसोबत माझ्याही ज्ञानात भर पडेल असा विचार करून शिकवायला लागलो. जिल्हा शिक्षण अधिकारी अरविंद कुमार म्हणाले, मुलांचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. त्यामुळे सरकार १५ नोव्हेंबर रोजी ग्राम पंचायतीचा गौरव करेल.
बातम्या आणखी आहेत...