आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंतरजातीय विवाह करणाऱ्या दलित तरुणाचा पत्नी समक्ष खून; सासऱ्याने मृतदेह जाळला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुटुंबियांनी विरोध केल्यानंतर दोघांनी मुंबईला जाऊन विवाह केला होता. - Divya Marathi
कुटुंबियांनी विरोध केल्यानंतर दोघांनी मुंबईला जाऊन विवाह केला होता.
हैदराबाद - आंतरजातीय विवाह केल्यानंतर गेल्या महिनाभरापासून बेपत्ता असलेला दलित तरुण अंबोजी नरेश याला पोलिसांनी मृत घोषित केले आहे. नरेश बेपत्ता नव्हता, तर सासऱ्यांनी त्याच्या पत्नी स्वाती समक्ष त्याचा खून केला होता असा खुलासा देखील पोलिसांनी केला आहे. एवढेच नव्हे, तर त्याचा पत्ता लागू नये म्हणून सासरा श्रीनिवास रेड्डी याने नरेशचा मृतदेह जाळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
 
लव्ह मॅरेज स्वीकारतो म्हणून बोलावले होते...
हैदराबादेत एकाच वर्गात शिकणारे स्वाती आणि नरेश एकमेकांच्या प्रेमात पडले. तुम्मला स्वाती उच्चवर्णीय असल्याने तिच्या आणि अंबोजी नरेश याच्या कुटुंबियांनी लग्नाला तीव्र विरोध केला. यानंतर दोघांनी मुंबईला पसार होऊन 25 मार्च रोजी विवाह केला होता. लग्नाच्या दोन महिन्यानंतर मे महिन्यात स्वातीचे वडील श्रीनिवास रेड्डी यांनी दोघांनाही स्वीकारतो म्हणून परत बोलावले होते. यानंतर स्वातीने आत्महत्या केली तर नरेश बेपत्ता झाला. या घटनेच्या जवळपास एका महिन्यानंतर पोलिसांनी नेमके काय झाले होते, याचा खुलासा केला. 
 
पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले...
तुम्मला स्वाती हिचे वडील श्रीनिवास रेड्डी याच्यावर पोलिसांना सुरुवातीपासूनच संशय होता. त्यानेच स्वातीला फोन करून आपला पती नरेशला शेतात बोलावण्यास भाग पाडले. त्यानुसार, 2 मे रोजी नरेश हैदराबादपासून 40 किमी दूर एका खेड्यातील शेतात आला. त्याचवेळी रेड्डी, त्याचा भाऊ आणि पुतण्याने नरेशचा खून केला. खून झाला त्यावेळी घटनास्थळी स्वाती सुद्धा उपस्थित होती. या घटनेचा पत्ता कुणालाही लागू नये अशा प्रयत्नात त्यांनी नरेशचा मृतदेह जाळून भस्मसात केला. 
 
स्वातीचे काय झाले?
आपल्या पतीचा आपल्याच डोळ्यासमोर खून होताना ती पाहू शकली नाही. नरेशच्या खुनाच्या धक्क्यात असतानाही वडील रेड्डींनी तिचा विवाह दुसऱ्याशी लावण्याची तयारी सुरू केली. याच तणावात तिने कथितरीत्या टॉयलेट क्लीनर पिऊन आत्महत्या केली. तेलंगणा पोलिसांना न्यायालयाने स्वाती आणि नरेश यांना ज्या दिवशी कोर्टात हजर करण्याचे आदेश दिले, त्याच्या अवघ्या काही तासांपूर्वीच स्वातीचा मृत्यू झाला. त्यामुळे, पोलिसांनी स्वातीच्या मृत्यूवर सुद्धा संशय व्यक्त केला. 
 
या घटनेनंतर पोलिसांनी स्वातीचे वडील, काका आणि चुलत भावाला अटक केली असून यापूर्वी अटक करण्यात आलेल्या नरेशच्या काकांची सुटका करण्यात आली आहे. 
बातम्या आणखी आहेत...