आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Telengan Ministers Portfolio Changed In New Year Night By Chief Minister

तेलंगणातील मंत्र्यांचे खाते मुख्‍यमंत्र्यांनी बदलल्याने नवा वादास प्रारंभ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद - नव्या वर्षाच्या आगमानासाठी हैदराबादेत जल्लोष सुरु असताना मंगळवारी रात्री मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांनी राज्य मंत्रिमंडळातील तेलंगणा भागातील मंत्र्याचे खाते बदलून नव्याच वादाला तोंड फोडले आहे. नागरी पुरवठा व संसदीय व्यवहार मंत्री श्रीधर बाबू यांच्याकडील संसदीय व्यवहारपदाची जबाबदारी काढून त्यांना व्यावसायिक कर खात्याचे मंत्रिपद देण्यात आले. रेड्डी यांच्या अचानक बदलामुळे मंत्रिमंडळातील तेलंगणा भागातील सहका-यांनी व आमदारांनी टीकेची झोड उठवली.
राज्याच्या विभाजनाच्या मुद्यावरून आंध्र प्रदेश काँग्रेस पक्ष आणि रेड्डी सरकारमध्ये तेलंगणा आणि सीमांध्र भागातील मंत्री - आमदारांचे सरळसरळ दोन तट पडले आहेत.त्यामुळेच नागरी पुरवठा मंत्री श्रीधर बाबूंचे संसदीय व्यवहार मंत्रीपद काढताच पक्षात वादाला तोंड फुटले.संसदीय व्यवहार मंत्रीपदाचा भार आता शिक्षणमंत्री एस.सैलजानाथ यांना देण्यात आला आहे. श्रीधर बाबू हे तेलंगणाचे तर सैलजानाथ हे सीमांध्र भागातील नेते आहेत. मंत्रिमंडळात खांदेपालट करण्याचा मला अधिकार आहे.त्यानुसार प्रशासकीय सोयीसाठी हा बदल करण्यात आला आहे. व्यावसायिक कर महसूलात सातत्याने घट येत आहे. त्यात वाढ करण्यासाठी श्रीधर बाबूंची नेमणूक करण्यात आली आहे, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री रेड्डी यांनी दिले आहे.व्यावसायिक कर महसूल गतवर्षी 15 टक्के होता तो आता 9.5 टक्क्यांवर आला आहे अशी आकडेवारीही रेड्डी यांनी यावेळी दिली.
रेड्डींचा पोकळ युक्तिवाद
राज्याच्या एकूण महसूलात व्यावसायिक कराचा वाटा 26 टक्के आहे. परंतु गेल्या तीन वर्षांपासून व्यावसायिक कर खाते मुख्यमंत्र्यांकडेच होते. त्यामुळे रेड्डींचा हा युक्तिवाद पोकळ ठरला आहे. त्यामुळे तेलंगणातील काँग्रेस नेते भडकले आहेत.
खरे कारण वेगळेच
शुक्रवार, 3 जानेवारीपासून आंध्र विभाजनाचा मसुदा पारित करण्यासाठी विधीमंडळाचे विशेष अधिवेशन सुरु होत आहे. स्वतंत्र तेलंगणा मुद्यावर गोंधळ न होता चर्चा करण्यासाठी श्रीधर बाबूंना आपल्या पदाचा वापर करता आला असता. समन्वय राखून हा मसुदा पारित करणे त्यांना सोपे गेले असते.
श्रीधरबाबूंचा सुत्रे स्वीकारण्यास नकार
रातोरात संसदीय मंत्रिपदाचा कार्यभार काढून घेतल्याने श्रीधरबाबू खवळले. व्यावसायिक कर खात्याच्या मंत्रिपदाची सुत्रेच स्वीकारणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यांनी राजीनामा देण्याचीही तयारी दर्शवली होती.पंरतु के.जनारेड्डींसारख्या नेत्यांनी त्यांचे मन वळवले.
तेलंगणाचे मंत्री राज्यपालांच्या भेटीला
मंत्रिमंडळात खांदेपालट होताच तेलंगणा भागातील मंत्र्यांचे शिष्टमंडळाने राज्यपाल ई. एस. एल. नरसिंहन यांची भेट घेतली. पंचायत राज मंत्री के.जनारेड्डी यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळाने खांंदेपालटाबद्दल कडक शब्दात निषेध नोंदवून मंत्रिमंडळात बदल करून मुख्यमंत्री आसुरी आनंद उपभोगत असल्याचा आरोप केला.