आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जम्मू-काश्मीरमध्ये आत्मघाती हल्ला; महाराष्ट्राच्या दोघांसह 7 जवान शहीद, 6 अतिरेकी ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड जिल्ह्यातील संभाजी कदम नागरोटा भागातील हल्ल्यात शहीद झाले. - Divya Marathi
नांदेड जिल्ह्यातील संभाजी कदम नागरोटा भागातील हल्ल्यात शहीद झाले.
जम्मू - पोलिसांच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी मंगळवारी पहाटे नगरोटामध्ये (जम्मू) भारतीय लष्कराच्या चौकीवर केलेल्या आत्मघाती हल्ल्यात एका मेजरसह दोन अधिकारी आणि ५ जवान शहीद झाले. यादरम्यान लष्कराने केलेल्या कारवाईत सहा दहशतवादी मारले गेले. शहिदांमध्ये महाराष्ट्रातील लोहा तालुक्यातील (जि. नांदेड) जानापुरी गावचे रहिवासी नायक संभाजी यशवंत कदम आणि पंढरपूर येथील मेजर कुणाल मुन्नागीर गोसावी (३२) यांचा समावेश आहे.
लष्कराचे पीआरओ लेफ्ट. कर्नल मनीष मेहता यांनी सांगितले, मंगळवारी पहाटे पाच वाजता दहशतवाद्यांनी चौकीच्या गेटवर तैनात सुरक्षा रक्षकावर हातबॉम्ब फेकले. रक्षकाने गोळीबार करताच दहशतवादी अंदाधुंद गोळीबार करत आत घुसण्याचा प्रयत्न करत होते. तीन-चार तास येथेच चकमक झडली. येथे एका अधिकाऱ्यासह तीन जवान शहीद झाले. यानंतर दहशतवादी तेथील दोन इमारतींत घुसले. या इमारतींत काही अधिकारी व त्यांचे कुटुंबीय राहतात. दहशतवाद्यांनी या सर्वांना ओलीस ठेवले. मात्र, ओलीस ठेवलेले १२ जवान, २ महिला व २ मुलांची सुटका करण्यात भारतीय जवानांना यश आले. यादरम्यान आणखी एक अधिकारी व दोन जवान शहीद झाले. सायंकाळी उशिरापर्यंत ही चकमक सुरू होती. दरम्यान, सहा दहशतवाद्यांचे मृतदेह हाती लागले असून १४ तासांची ही कारवाई अंधार पडल्यावर थांबवावी लागली.

हल्ल्यानंतर जम्मू-श्रीनगर महामार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली. हा मार्ग नगरोटा चौकीच्या मधून जातो. जम्मू शहरातही दक्षतेचे आदेश असून नगरोटा येथील सर्व शैक्षणिक संस्था बंद करण्यात आल्या आहेत. उधमपूर येथील लष्कराचे मुख्यालय आणि वैष्णोदेवी भागातही सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

पोलिस वेशात ट्रकने आले दहशतवादी
हल्लेखोर दहशतवादी एका ट्रकमध्ये आले होते. पोलिसांच्या वेशात असल्यामुळे त्यांना कुणीही अडवले नाही. या ट्रकचा शोध सुरू आहे. नगरोटा चौकीवर हल्ला करून हे दहशतवादी इमारतीत घुसून मेसपर्यंत पोहचले होते.
नांदेडचा नायक संभाजी कदम, मुद्दाम काश्मीरमध्ये बदली मागून घेतली
लोहा तालुक्यातील (जि. नांदेड) जानापुरी येथील नायक संभाजी यशवंत कदम (३५) यांनी दहशतवाद्यांविरुद्ध लढण्याच्या जिद्दीपोटी पाच महिन्यांपूर्वी स्वत:हून काश्मीरमध्ये बदली मागून घेतली होती. २००१ मध्ये ते लष्करात भरती झाले होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी सखुबाई व तीन वर्षांची मुलगी तेजस्विनी असे चार जणांचे कुटुंब आहे. हे सर्वजण पुणे येथे राहतात. वडील यशवंत कदम हे खासगी कंपनीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी जानापुरी येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. पाच- मराठा लाइट इन्फंट्रीचे जवान संभाजी यांचे पार्थिव विशेष विमानाने नांदेड विमानतळावर आणले जाईल. १४ वर्षांपूर्वी लष्करात दाखल झालेले व पाच महिन्यांपूर्वी पुण्यात सेवेत असलेले संभाजी दीड वर्षांनी निवृत्त होणार होते. मात्र, अखेर दहशतवाद्यांशी लढत त्यांनी प्राणाची आहुती दिली.
पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या पंढरपूरचा वीर जवान शहिद मेजर कुणाल गोसावी बद्दल...
बातम्या आणखी आहेत...