आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Terror Strikes Bangalore; Congress, BJP Target Each Other

बंगळुरूत तीन वर्षांनी पुन्हा धमाका, पुण्यात हाय अलर्ट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू- कर्नाटकची राजधानी बंगळुरूत बुधवारी बरोबर तीन वर्षांनंतर पुन्हा 17 एप्रिल रोजीच अतिरेकी हल्ला झाला. भाजप कार्यालयाबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटात 11 पोलिसांसह 16 जण जखमी झाले. दोघांची प्रकृती गंभीर आहे. याआधी 2010 मध्ये याच दिवशी आयपीएल सामन्यादरम्यान चिन्नास्वामी स्टेडियमजवळ स्फोट झाला. यात 15 जखमी झाले होते. बुधवारी सकाळी 10.30 वाजता झालेल्या स्फोट अतिरेकी हल्ला असल्याचे गृहमंत्री आर. अशोक यांनी म्हटले आहे. पोलिस व्हॅनसह 20 हून जास्त वाहनांचे यात नुकसान झाले. पोलिस आधी सिलिंडर स्फोट म्हणत होते. नंतर बॉम्बस्फोट असल्याचे आयुक्त राघवेंद्र औरादकर म्हणाले.

उमेदवारीचा शेवटचा दिवस
शहरातील वर्दळीच्या मल्लेश्वरम भागात भाजप कार्यालय आहे. 5 मे रोजी होणा-या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची बुधवारी शेवटची तारीख होती. त्यामुळे कार्यालयात गर्दी होती.

दुचाकी ठेवल्यानंतर 25 मिनिटांनी धमाका
तपासासाठी एनआयएचे पथक दाखल झाले. तामिळनाडूची नंबर प्लेट असलेल्या दुचाकीवर 2 किलो स्फोटके ठेवून घातपात घडवण्यात आला. सीसीटीव्हीनुसार 20-22 वर्षांच्या तरुणाने दुचाकी उभी केल्यानंतर 25 मिनिटांनी स्फोट झाले.

राजकारणाचा तोच जुना खेळ
आधी काँग्रेसचे मत,
भाजपला फायदा होईल : काँग्रेस नेते शकील अहमद यांनी ट्विटरवर म्हटले, स्फोट दहशतवादी हल्ला असेल तर निवडणुकीत त्याचा भाजपला फायदा होईल.
मग भाजपचे उत्तर : दहशतवादी हल्ल्यांतही काँग्रेस मते शोधत असते. ही पक्षाची भूमिका आहे काय हे सोनिया, पंतप्रधानांनी स्पष्ट करावे, असे भाजपाध्यक्ष राजनाथ म्हणाले.
त्यानंतर स्पष्टीकरण : ट्वीटबाबत बोलण्यास अहमद यांना मनाई करण्यात आली. अतिरेकी हल्ल्यांत राजकीय अर्थ काढला जाऊ नये, असे गृह राज्यमंत्री आरपीएन सिंह म्हणाले.

पुण्यात हाय अलर्ट
बंगळुरू स्फोटानंतर पुण्यात बंदोबस्त वाढवण्यात आला. कोरेगाव पार्कवर जर्मन बेकरी, ओशो आश्रम, छाबड हाऊस, दगडूशेठ हलवाई गणपती, विमानतळाची सुरक्षा वाढवण्यात आली, असे विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त एम.बी. तांबडे म्हणाले. जर्मन बेकरी स्फोटाप्रकरणी हिमायत बेगला गुरुवारी येथे शिक्षा सुनावली जाणार आहे.