नवी दिल्ली/श्रीनगर- पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय जवानांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर तीन दिवसांनी रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास अतिरेक्यांनी बारामुल्लामधील 46- राष्ट्रीय रायफल्स आणि सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) छावणीवर आत्मघाती हल्ला केला. जवानांनी प्रत्युत्तरादाखलच्या कारवाईत 2 अतिरेकी मारले गेले, तर एक जवान शहीद झाला. पाच जण जखमी झाले आहेत. सतर्क सुरक्षा दलांनी छावण्यांत घुसण्याचा अतिरेक्यांचा प्रयत्न हाणून पाडला. चार पैकी दोन अतिरेकी फसार झाल्याची माहिती मिळाली आहे.
या पार्श्वभूूमीवर राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी संरक्षण मंत्र्यांनी तिन्ही दलांच्या प्रमुखांना बोलवण्यात आले आहेे. दरम्यान, जम्मू काश्मीरमध्ये हाय अलर्ट घोषित करण्यात आला असून संवेदनशिल भागात अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली आहे.
उरी हल्ल्यानंतरच्या 14 दिवसांत जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय जवानांवर झालेला हा दुसरा मोठा हल्ला आहे. राष्ट्रीय रायफल्स दहशतवादविरोधी मोहिमा चालवते. त्यामुळे या छावणीला लक्ष्य करण्यात आले. दरम्यान, बीएसएफच्या महासंचालकांनी गृहमंत्री राजनाथसिंह यांना यासंबंधीची सविस्तर माहिती दिली. रात्री उशिरा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनीही गृहमंत्र्यांना माहिती दिली. राजनाथ सोमवारी दोन दिवसांच्या काश्मीर दौऱ्यावर जात आहेत.