श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील सोपोर येथे मंगळवारी दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी सोपोरमधील तुजर शरीफ येथील एका पोलिस चौकीला लक्ष्य केले. यात एक पोलिस कर्मचारी शहीद तर, एक जखमी झाला आहे. दरम्यान, उधमपूर हल्ल्यात जिवंत पकडण्यात आलेला दहशतवादी नावेदची मदत करणाऱ्या दोन संशयीतांचे राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) स्केच जारी केले आहेत. नावेदचे हे दोन्ही साथीदार फरार आहेत. त्यांची माहिती देणाऱ्यास 5 लाख रुपये बक्षिस देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
एनआयएने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दोन्ही आरोपींची माहिती देण्यात आली आहे. एकाचे नाव जरघम मोहम्मद भाई आहे. याचे वय 38 ते 40 दरम्यान असून उंची साधारण पाच फूट तीन इंच आहे. तो पाकिस्तानातील खैबर पख्तूनवी प्रांतातील आहे. दुसऱ्याचे नाव अबू ओकासा, वय 17 ते 18 वर्षांदरम्यान, उंची 5 फूट 2 इंच. हा देखील खैबर पख्तूनवी प्रांतातील आहे. नावेद आणि त्याच्या सथादारांनी 5 ऑगस्ट रोजी बीएसएफच्या बसवर हल्ला केला होता. त्यात नावेदचा एक साथीदार मारला गेला तर दोन जवान शहीद झाले होते.
नावेदची आज लाय डिटेक्टर टेस्ट
सूत्रांच्या माहितीनूसार, मंगळवारी नावेदची लाय डिटेक्टर टेस्ट केली जाईल. त्याशिवाय डीएनए आणि आवाजाचे नमुने घेतले जातील. डीएनएमुळे तो पाकिस्तानी असल्याचा दाव्यांना पुष्टी मिळण्याची शक्यता आहे. पाकिस्तानने अद्याप तो त्यांचा नागरिक असल्याचे मान्य केलेले नाही. सोमवीर नावेदला कोर्टात हजर करण्यात आले होते, तेव्हा कोर्टाने लाय डिटेक्टर टेस्टला मंजूरी दिली होती. तसेच, नावेदनेही होकार दिला आहे.