आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

100 वर्षांचे श्याम नेगी देशाचे पहिले मतदार, २९व्या वेळी मत, पहिले मत पत्र्याच्या मतपेटीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिमला- देशातील पहिले मतदार श्याम शरण नेगी हिमाचल प्रदेश निवडणुकीसोबत तेराव्या वेळेस विधानसभा निवडणुकीत मताधिकार बजावतील. २५ ऑक्टोबर १९५१ रोजी देशात पहिल्यांदा मतदान झाले तेव्हा नेगी मतदान करणारे पहिले व्यक्ती होते. नेगी यांनी तेव्हापासून ६६ वर्षात मतदान प्रक्रियेतील ५ लहान-मोठे बदल पाहिले आहेत. त्यांनी १६ वेळा लोकसभा निवडणुकीत मतदान केले. राज्य निवडणूक आयोगाने नेगी यांना ब्रँड अॅम्बेसेडर केले आहे.  

नेगी कल्पाच्या  मुहाली चिनी मतदान केंद्रावर ९ नोव्हेंबरला मतदान करतील. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी पुष्पेंद्र राजपूत म्हणाले, आयोग त्यांना आणण्यासाठी गाडी पाठवेल. मतदान केंद्रावरही नेगी यांच्यासाठी रेड कार्पेट अंथरले जाईल. पहिल्या मतदानाचा अनुभव सांगताना नेगी म्हणाले, देशात निवडणूक होत असल्याचे १९५१ मध्ये पहिल्यांदा कळले. देशाच्या अन्य भागांत जानेवारी-फेब्रुवारी १९५२ मध्ये निवडणूक झाली. हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टी होत असल्यामुळे ऑक्टोबर १९५१ मध्ये मतदान घेण्यात आले. २५ ऑक्टोबरला पहिल्यांदा मत दिले. मतदान केंद्रावर गोदरेजने तयार केलेले दणकट पत्र्याचे डबे होते. प्रत्येक डब्यावर वेगवेगळ्या पक्षांचे चिन्ह होते. आपल्या पसंतीच्या पक्षाच्या डब्यात मतपत्रिका टाकायची होती. तेव्हापासून आतापर्यंत प्रत्येक निवडणुकीत मतदान केले. त्या वेळचे राजकारण वेगळे होते. आता भ्रष्टाचार वाढला आहे. तरीही जोपर्यंत शरीर साथ देईल तोपर्यंत मतदान करत राहीन.  

यानंतर मतपत्रिकेवर शिक्का मारून मत देण्याचा नियम आला. १९९९ मध्ये मतपत्रिकेची जागा इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनने (ईव्हीएम) घेतली. २०१३ मध्ये ईव्हीएममध्ये नोटाचा पर्याय आला. हे सर्व बदल नेगी यांनी पाहिले आहेत. यंदा ते मतदानात व्होटर व्हेरिफाएबल पेपर ऑडिट ट्रेलचा(व्हीव्हीपॅट) वापर अनुभवतील. नेगी म्हणाले, ईव्हीएम आले तेव्हा मशीनमध्ये कसे मत टाकले जाईल याची उत्सुकता होती. यानंतर आता व्हीव्हीपॅटचा अनुभव घेऊ. पहिल्या निवडणुकीत सुमारे १७ कोटी मतदान होते. आता ही संख्या ८० कोटींहून अधिक झाली आहे. पहिल्या निवडणुकीत मतदान केल्यानंतर नेगी यांनी गावात फिरून लोकांना मतदानाचे महत्त्व समजावले होते.  

- नेगी यांचा मतदानातील उत्साह पाहता गुगल इंडियाने २०१४ मध्ये ‘ट्रू स्टोरी ऑफ ए मॅन हू नेव्हर मिस्ड अपॉर्च्युनिटी टू व्होट’ शीर्षकाचा व्हिडिओ संदेश जारी केला होता.  
 
बातम्या आणखी आहेत...