लखनऊ - सुमारे ८ महिन्यांपासून रक्तस्राव सुरू असल्याने लखनऊच्या ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या एका तरुणीचा मृत्यू झाला. पीस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अय्युब यांच्यावर नातेवाइकांनी बलात्काराचा अारोप केला. पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या मुलीस डॉक्टर करण्याचे स्वप्न दाखवून डॉ. अय्युब यांनी चार वर्षे तिचे लैंगिक शोषण केले. गर्भवती झाल्यानंतर त्यांनी तिला चुकीची औषधे दिली. यामुळे तिची प्रकृती ढासळत गेली.
२२ वर्षांची ही तरुणी संत कबीरनगर जिल्ह्याची रहिवासी होती. तिच्या भावाने सांगितले : आम्हाला तिचे लैंगिक शोषण होत असल्याची माहिती होती. परंतु समाजाच्या भीतीपोटी आम्ही याची वाच्यता केली नाही. डॉ. अय्युब यांनीच चुकीची औषधे दिल्याने गेल्या ८ महिन्यांपासून तिला रक्तस्राव होत होता. तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी तिच्या किडन्या व लिव्हर खराब झाल्याचे निदान केले. प्रकृती गंभीर झाल्यानंतर तिला केजीएमयू येथील ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना तिचे निधन झाले. यादरम्यान प्रकरण चिघळत गेल्याने वरिष्ठ पोलिस अधीक्षक मंजिल सैनी या रुग्णालयात गेल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.
डॉ. अय्युब म्हणाले: हा सपाचा कट
डॉ. अय्युब यांनी मुलीच्या नातेवाइकांनी केलेले सर्व आरोप फेटाळले. हा सर्व समाजवादी पक्षाचा कट आहे. त्यांनी म्हटले : २०१२च्या निवडणुकीत अशाच प्रकारचे आरोप करण्यात आले होते. खलिलाबाद येथे २७ फेब्रुवारीस मतदान असल्याने बदनामीसाठी समाजवादी पक्षाने हा डाव रचला आहे.