आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उघड्यावर शौच हे मानसिक क्रौर्य असल्याची सुनेची तक्रार, न्यायालयाकडून घटस्फोट मंजूर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो. - Divya Marathi
फाईल फोटो.
भिलवाडा - हुंडा, कौटुंबिक हिंसाचार, दीर्घकाळ दूर राहणे इत्यादींसाठी न्यायालयात घटस्फोटाचे अर्ज पाहायला मिळतात. याआधारे अनेक घटस्फोटही झाले आहेत. मात्र, सासरी घरात शौचालय नसल्याने उघड्यावर शौचास जावे लागत असल्याचे कारण देत राजस्थानातील एका महिलेने भिलवाड्याच्या कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला. उघड्यावर शौच हे एक प्रकारचे मानसिक क्रौर्य असल्याचे सांगत न्यायालयानेही घटस्फोटास परवानगी देऊन टाकली. अशा प्रकारचा हा देशातील पहिलाच घटस्फोट असल्याचे सांगितले जात आहे.  
 
भिलवाड्याच्या पूर या गावातील युवतीला आटूणमध्ये दिले होते. लग्नानंतर ती आटूणच्या सासरी गेली असता तिथे घरात शौचालयच नसल्याचे तिला माहीत पडले. इतकेच नव्हे तर झोपण्यासाठीही स्वतंत्र खोली नव्हती. कुटुंबीयांसमवेत अंगणातच झोपावे लागत होते. तिने यामुळे होणारी कुचंबणा सासरच्या मंडळींच्या कानावर घातली. मात्र, त्यांनी तिलाच क्रूर वागणूक द्यायला सुरुवात केली. विवाहितेने भिलवाड्याच्या सदर पोलिस स्टेशनमध्ये छळाची तक्रार दाखल केली. चौकशीनंतर हे प्रकरण कौटुंबिक न्यायालयात गेले. घरात शौचालय नसल्यामुळे महिलेच्या खासगी आयुष्यावर गदा येते. त्यामुळे या घटस्फोटास परवानगी दिली जात असल्याचे न्यायमूर्ती राजेंद्र शर्मा यांनी सांगितले.  
 
केंद्र आणि राज्य सरकारकडून उघड्यावर शौच न करण्यासंदर्भात जनजागृती अभियान सुरू आहे. शौचालय वापरण्यासंदर्भातही मोठ्या प्रमाणात जाहिराती सुरू आहेत. शौचालय बांधकामासाठी सरकारकडून अनुदानही दिले जात आहेत. न्यायमूर्ती म्हणाले, शौचालयाच्या अभावामुळे एक पत्नी मानसिक वेदना सहन करू शकत नाही आणि त्याची पतीला काहीच काळजी नाही. ही बाब पत्नीसाठी मानसिक क्रौर्य आणि आपत्तिजनक आहे. घरातही स्वतंत्र खोली नसल्यामुळे तिच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा येते. उघड्यावर शौचास जाणे हा प्रकारच लाजिरवाणा आहे. त्यामुळे प्रत्येकाने घरात शौचालय बांधावे, असा सल्लाही न्यायमूर्तींनी दिला आहे.  
 
उघड्यावर शौच, समाजासाठी कलंक  
शर्मा म्हणाले, आपल्या आया-बहिणी उघड्यावर शौचास जातात हे पाहून आपल्याला कधी दु:ख वाटत नाही का? गावातील महिला जोपर्यंत अंधार पडत नाही तोपर्यंत शौचास जात नाहीत. त्यांना अनेक शारीरिक यातना सहन कराव्या लागतात. आपल्या आई-बहिणीची प्रतिष्ठा जपण्यासाठी आपण व्यवस्था करायला हवी. २१व्या शतकात उघड्यावर शौचास जाण्याची प्रथा समाजासाठी कलंक आहे.
 
बातम्या आणखी आहेत...