चेन्नई - तामिळनाडूतील नव्या सरकारच्या विश्वास मताला आव्हान देणारी याचिका द्रमुकने केली होती. त्याच्या सुनावणीदरम्यान मद्रास उच्च न्यायालयाने विधानसभा सचिवांना नोटीस जारी केली आहे. उच्च न्यायालयाने सचिवांना विश्वासमत सादर झाले त्या दिवशीचे व्हिडिओ फुटेज सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
याशिवाय विधानसभा अध्यक्ष पी. धनपाल आणि मुख्यमंत्री पलानीसामी यांना नोटीस जारी केली आहे. पूर्वीच्या सुनावणीत उच्च न्यायालयाने याचिकाकर्ता द्रमुकचे कार्यकारी अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांना व्हिडिओ फुटेज सादर करण्याचे आदेश दिले होते. सोमवारी सुनावणीदरम्यान द्रमुकचे नेता आणि वकील आर. यांनी म्हटले की आपल्या अशिलाने विधानसभा सचिवांना पत्र पाठवून फुटेज देण्याची विनंती केली होती. मात्र फुटेज केवळ कोर्टाच्या आदेशानंतर मिळेल असे उत्तर मिळाले. त्यानंतर आता उच्च न्यायालयाने विधानसभा सचिवाला फुटेज सादर करण्याचे आदेश दिले. याप्रकरणी पुढील सुनावणी १० मार्च रोजी होईल.