आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तामिळनाडूत मंत्र्याच्या बंगल्यासह 50 ठिकाणी IT चे छापे, 85 कोटींचे दागिने जप्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - प्राप्तिकर विभागाच्या पथकांनी शुक्रवारी तामिळनाडूचे आरोग्यमंत्री सी. विजयभास्कर आणि एका आमदाराच्या निवासस्थानावर छापे टाकले. त्यांच्यावर कर चुकवल्याचा आरोप असून त्याची चौकशी सुरू झाली आहे. काही डॉक्टर, औषध कंपन्या आणि त्यांचे अधिकारी यांसह राज्यातील ३० ठिकाणी छापासत्र सुरू आहे. छाप्यात ५.५० कोटी रुपये रोख आणि ८५ कोटी रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले.  

अधिकाऱ्यांनी सांगितले की, या कारवाईत सुरक्षा कर्मचाऱ्यांसह प्राप्तिकर विभागाचे १०० अधिकारी-कर्मचारी सहभागी आहेत. राज्यातील एका वैद्यकीय विद्यापीठाच्या एका अधिकाऱ्याच्या ठिकाणांवरही छापा टाकण्यात आला आहे. एका आमदाराच्या निवासस्थानीही छापा टाकण्यात आला आहे, पण त्याबाबत अधिक माहिती देण्यास नकार देण्यात आला.  अभिनेता शरदकुमारच्या घरावरही छापा टाकण्यात आला. चेन्नई, पुडुकोट्टईसह विविध ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत, अशी माहिती देऊन या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आर. के. नगर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत काळा पैसा वापरला जात आहे, अशी माहिती आम्हाला मिळाली होती. अद्रमुकच्या अम्मा गटातर्फे पैसे वाटले जात असल्याच्या अनेक तक्रारीही आमच्याकडे आल्या होत्या. आर. के. नगरमध्ये १२ एप्रिलला पोटनिवडणूक होत आहे. दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली आहे. अद्रमुकच्या दोन्ही गटांनी ही जागा प्रतिष्ठेची केली आहे. अद्रमुकच्या अम्मा गटाने टीटीव्ही दिनकरन यांना येथून उमेदवारी दिली असून विजयभास्कर हे त्यांचे निष्ठावंत म्हणून परिचित आहेत.
शेखर रेड्डीच्या चौकशीतून महत्त्वाचे धागेदोरे हाती : नोटाबंदीनंतर झालेल्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी खाणसम्राट शेखर रेड्डीला अटक करण्यात आली होती. त्याच्या चौकशीतून काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. त्यातून ही कारवाई करण्यात आली आहे, असे समजते. 
 
‘त्रास देण्यासाठी छापे’
मंत्री विजयभास्कर म्हणाले की, आमचे उमेदवार दिनकरन पोटनिवडणूक जिंकणार आहेत. त्यामुळे माजी मंत्री पन्नीरसेल्वम हे भाजपशी हातमिळवणी करून छापे टाकत आहेत. मला त्रास दिला जात आहे. एवढेच नाही तर मुलांना शाळेतही जाऊ दिले जात नाही.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...