आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली-गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेली बर्फवृष्टी आणि तापमान घसरल्याने जम्मू-काश्मीर, दिल्लीसह उत्तर भारतात थंडीची लाट आली आहे. देशात सर्वाधिक कमी तापमान पर्यटनाचे ठिकाण असलेल्या काश्मिरात गुलमर्गला नोंदवले गेले. उत्तर भारतात नाताळाच्या दिवशी लख्ख सूर्यप्रकाश होता, परंतु तापमान घसरल्याने थंडीची तीव्रता वाढली आहे.
दिल्लीत बुधवारी सकाळी प्रसन्न वातावरण होते. पहाटे शहरावर सगळीकडे दाट धुके पसरले होते. नंतर ते धुके निवळले. ‘आप’च्या सरकार स्थापनेच्या घोषणेनंतर राजकीय वातावरण तापले असताना सकाळी भावी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ‘आप’ची टोपी आणि त्यावर मफलर बांधूनच पत्रकारांना सामोरे गेले. दिल्लीत मंगळवारच्या तुलनेत बुधवारी किमान तापमान आणखी घसरून ते 7.5 डिग्री सेल्सियस नोंदवले गेले. दिवसभर गार वारे वाहत असल्याने बोच-या थंडीतही सुटी घालवण्यासाठी बाहेर पडले.
काश्मीर खो-यात बर्फवृष्टीची विश्रांती
वरच्या पट्ट्यात काश्मीर खो-यात बुधवारी बर्फवृष्टी आणि पावसाने विश्रांती घेतली. मात्र, अनेक ठिकाणी तापमान गोठनबिंदूच्या खालीच होते. जम्मू आणि काश्मिरात गुलमर्गमध्ये नाताळच्या सुटीनिमित्त पर्यटकांचे जत्थे आले आहेत. शहरात कडाक्याची थंडी आणि सगळीकडे बर्फच बर्फ पसरला असून बर्फावर स्कीइंग करण्याची मजा लुटत आहेत. या ठिकाणी तापमान सर्वात कमी (उणे 9.3 ) नोदंवले गेले.
हिमाचलही गारठला
काही दिवसांपूर्वी बर्फवृष्टी झाल्यानंतर हिमाचल प्रदेशही गारठला आहे. अनेक ठिकाणी पारा गोठणबिंदूच्या जवळपास आहे. हिमाचलच्या डोंगराळ भागात प्रचंड थंडी पडली असून तिथे तापमान उणे 10 व उणे 18 नोंदवले गेले. नदीच्या किना-यावरील शहरे, गावांमध्ये दाट धुके पसरले आहे. पर्यटनाची केंद्रे असलेल्या सिमला आणि धर्मशाला येथे अनुक्रमे उणे 4.5 व 5.8 तापमान नोंदले गेले.
पंजाब, हरियाणात लाट
पंजाब,हरियाणातही थंडीची लाट आली आहे.दोन्ही राज्यांमध्ये सकाळी दाट धुक्यामुळे वाहने चालवणेही अवघड होत आहे.चंदिगडमध्ये आतापर्यंत सर्वाधिक कमी तापमान 5.7 नोंदवले गेले. बुधवारी सकाळचे वातावरण प्रसन्न होते. हरियाणात नारनौल येथे सर्वाधिक कमी तापमानाची (3.2) नोंद झाली. पंजाबमध्ये अमृतसरला 5.2 तर लुधियाना, पतियाळा येथेही 6.6 व 7 तापमान होते.
राजस्थानात रेल्वे लेट
एरवी असह्य ऊन असणारा राजस्थानही थंडीच्या कचाट्यात सापडला आहे. उत्तर व पश्चिमेकडून येणा-या थंडगार वा-यांमुळे राज्यात चुरू या शहरात सर्वाधिक कमी 1.5 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाली.दाट धुक्यामुळे उत्तर-पश्चिम रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. एक गाडी रद्द करावी लागली, तर तीन गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या. आठ गाड्या उशिरा धावत आहेत.
हायवेवरील वाहतूक विस्कळीत : राजस्थानातील महामार्गांची वाहतूक विस्कळीत झाली आहे. दिल्ली-जयपूर,जयपूर-आग्रा,जयपूर-कोटा,जयपूर-उदयपूर या राज्यांतील महामार्गावरील धुक्यामुळे गाडी चालवताना त्रास होत आहे. उत्तर प्रदेशातही अलाहाबाद,लखनऊ, वाराणसी, फैजाबाद, झांसी येथील तापमान घसरले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.