जयपूर- येथील रामगंज भागात उसळलेल्या हिंसाचारात एक जण जागीच ठार झाला, तर पोलिसासह अनेक जण जखमी झाले. जयपूर शहरातील चार पोलिस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लावण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत ठार झालेल्या व्यक्तीचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याच्या मृत्यूचे कारण समजू शकेल. या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली.
एका जोडप्यास पोलिस हवालदाराने मारहाण केल्याच्या अारोपावरून लोकांनी रामगंज पोलिस ठाण्याबाहेर संतप्त निदर्शने केली. नंतर जमावाने आपला मोर्चा विद्युत कंपनीच्या कार्यालयाकडे वळवला. ते विद्युत केंद्रही जाळून टाकण्यात आले. या वेळी एक रुग्णवाहिका व पोलिस जीपसह अनेक वाहने जाळण्यात आली. पोलिसांनी निदर्शकांना काबूत आणण्यासाठी रबरी गोळ्या चालवल्या. जमावाला पांगवण्यासाठी त्यांनी अश्रुधुराचा वापर केला तसेच हवेत गोळीबाराच्या फैरीही झाडल्या. शहरातील चार पोलिस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच अफवा पसरू नये म्हणून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. शाळाही बंद ठेवण्यात आल्या आहेत.
जोडप्यात आणि हवालदारात बाचाबाची
मोटारसायकलवरून जाणाऱ्या जोडप्यात आणि हवालदारात किरकोळ करणावरून बाचाबाची झाली. त्यामुळे चिडलेल्या हवालदाराने जोडप्यास मारहाण केली, असा अारोप करत जमावाने पोलिस ठाण्याबाहेर निदर्शने केली. तणाव वाढत गेल्याने शहरात संचारबंदी लागू केली.