पानीपत / फरिदाबाद - हरियाणाच्या एका पंचायतीने गँगरेपच्या प्रकरणात आरोपींना 50 हजार रुपये दंड आणि पाच जोडे मारण्याची शिक्षा देऊन आरोपींची मुक्तता केली. ही घटना 12 मे रोजी घडली होती. त्यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिस स्टेशन गाठून तक्रार नोंदवली. आता पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.
काय आहे प्रकरण
फरिदाबादच्या जकोपूर गावातील ही घटना आहे. पोलिसांनी सांगितले, की अल्पसंख्याक समाजाच्या एका मुलीवर अत्याचार करण्यात आला. पीडितेवर पितृछत्र नाही. ती आई आणि भावासह राहाते. 12 मे रोजी तरुणी शेजारच्या घरी पाणी आणण्यासाठी गेली होती. तिथे उपस्थित दोन तरुणांनी तिच्यावर बळजबरी केली. पीडितेने तिच्या आईला याती माहिती दिली त्यानंतर दोघा मायलेकींनी पोलिसात तक्रार दाखल केली. मात्र गावातील पंचायतीने त्याआधी निर्णय करुन टाकला होता. आरोपींना 50 हजार रुपये दंड आणि पाच जोडे मारण्याची शिक्षा सुनावली. त्यानंतर आरोपी फरार झाले. आता पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून आरोपींचा शोध सुरु आहे. पोलिसांनी पीडित कुटुंबाला विश्वास दिला आहे, की लवकरच आरोपींना जेरबंद केले जाईल.