आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीतेची अग्निपरीक्षा झालेल्या ठिकाणावरील माती आजही दिसते राखेसारखी काळी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीलंकेहून लाइव्ह- सीता अम्मा मंदिरात स्थानिक भाविक सायंकाळी सातनंतर कधीतरीच येतात. त्यामुळे या ठिकाणी खूप शांतता असते. रात्रीच्या झगमगाटात आम्ही दिव्यांची आरास लावली. अनेक युगे गेली, भारतीयांच्या मनात राम कायम आहेत, तर इकडे श्रीलंकन लोकांच्या स्मृतीत सीताही सुरक्षित आहे. नुवारा एलियाच्या घनदाट उंच डोंगरातील हिरवळीत अशोक वाटिका होती. दोन्ही दिशेला निम्मे अवकाश गाठणाऱ्या एका डोंगराच्या कोपऱ्यात सीतेचे मंदिर आहे. या भागात अनेक मंदिरे आहेत. मात्र, फक्त सीतेच्या मंदिरातच माकडे दिसतात.
 
मंदिराच्या प्रवेशद्वारापासून आतपर्यंत हनुमानाच्या अनेक मूर्ती आहेत. मंदिराच्या मागे मोठ्या दगडावर हनुमानाच्या पायांचे ठसेही आहेत.  येथे एका विशिष्ट जातीचे अशोक वृक्ष आढळतात. त्याला एप्रिल महिन्यात लाल रंगाची फुले लागतात. संजीवनी बुटीसाठी हनुमानाने उचलून आणलेल्या पर्वतावरील वनस्पतींचेच हे विस्तारित रूप असल्याची कथा प्रसिद्ध आहे. सिंहली आयुर्वेदात या औषधी आजही वरदान मानल्या जातात. देवुरूम वेला नामक ठिकाणी सीतेची अग्निपरीक्षा झाली होती, अशी कथा प्रचलित आहे. संपूर्ण श्रीलंकेत लालसर रंगाची माती अाढळते. परंतु फक्त याच ठिकाणी अाश्चर्यजनकरीत्या काळ्या राखेसारखी माती आढळते. श्रीलंकेचे शिक्षण राज्यमंत्री व्ही. राधाकृष्णन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. “दिव्य मराठी’शी चर्चा करताना ते म्हणाले,  रावणाच्या लंकेचे याच ठिकाणी दहन झाले. मातीच्या जाड काळ्या थरामुळे स्थानिक लोकांमध्ये लंका दहनाविषयीची ही धारणा आहे. सीतेच्या स्मृतीशी संबंधित हे ठिकाण आता एक पवित्र तीर्थक्षेत्र बनले आहे. वनवासादरम्यान १४ वर्षांत राम, लक्ष्मण आणि सीतेने कुठे किती वेळ घालवला आणि सीता लंकेत किती वर्षे राहिली याबाबत रामेश्वरात वास्तव्यास असलेले आणि सध्या पंचवटीत असलेले पंडित विष्णू शास्त्री सांगतात की, भगवानाने वनवासातील १२ वर्षे चित्रकुटात घालवली. वर्षभर पंचवटीत राहिले. येथूनच रावणाने सीतेचे अपहरण केले. येथूनच रामाने किष्किंधाच्या दिशेने प्रयाण केले. तिथे त्यांची हनुमान आणि सुग्रीव यांच्याशी मैत्री झाली, बालीवध झाले. रामेश्वरात जटायूचे बंधू संपाती यांनीच सीतेच्या शोधात निघालेल्या वानरांना सीतेचा पत्ता सांगितला होता. त्यानंतर रामाचे रामेश्वरात आगमन, सेतूनिर्मिती आणि युद्धासाठी लंकेकडे प्रस्थानाचा काळ आहे. सीता लंकेत ११ महिने राहिल्या, असा अंदाज आहे. सीता मंदिराचे विश्वस्त एस. थियागूसुद्धा या मान्यतेला दुजोरा देतात.   

रिंग फेस्टिव्हल
श्रीलंकेत दरमहिन्याला पोएडे अर्थात पूजेचा एक दिवस निश्चित असतो. सीता अम्मा मंदिरात तेव्हा गर्दी असते. शेकडो पर्यटक स्थानिक भाविकांसोबत सीतेची कथा एेकायला येतात. जानेवारीत पोंगलच्या महिनाभरापूर्वी तामिळ समाजाच्या गावागावांत भजने गायली जातात. १५ जानेवारीला पूर्णाहुतीच्या मुहूर्तावर शोभायात्रा काढली जाते. रामदूताच्या रूपात हनुमानाने याच ठिकाणी अशोक वाटिकेत सीतेला अंगठी दिली होती. हा दिवस रिंग फेस्टिव्हलच्या रूपात प्रसिद्ध आहे.
बातम्या आणखी आहेत...