आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिसर्‍या आघाडीची तयारी : प्रादेशिक पक्षांची मोट बांधून नवा राजकीय पर्याय देण्याची तयारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुवनेश्वर - 2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजप आणि काँग्रेसला कधीही सत्ता मिळवता येणार नाही. दोन्ही पक्षांकडे तेवढी क्षमता नसेल, असा दावा भाकपने रविवारी केला. त्याचबरोबर डावे, लोकशाहीवादी पक्ष, प्रादेशिक पक्ष एकत्र येऊन राजकीय पर्याय मिळेल, अशी ग्वाहीदेखील पक्षाकडून देण्यात आली.
जनतेचा काँग्रेसवर रोष आहे. त्यामुळे केंद्रात सरकार स्थापन करण्याएवढी काँग्रेसकडे क्षमता नसेल. त्याचबरोबर पुरेसे संख्याबळ नसल्याने भाजपही हतबल ठरेल, अशी भविष्यवाणी भाकपचे राष्ट्रीय चिटणीस ए. बी. वर्धन यांनी केली आहे. रविवारी ते पत्रकारांशी बोलत होते. काँग्रेस-भाजपेतर आघाडीच्या स्थापनेविषयी आपण प्रचंड आशावादी आहोत. त्यासाठी निवडणुकीपूर्वीच आघाडी तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
आघाडीत बिजू जनता दल, जनता दल (संयुक्त), अण्णा द्रमुक हे प्रादेशिक पक्ष असतील. अनेक प्रादेशिक पक्ष सध्या केंद्रात घटक पक्ष म्हणून सहभागी नाहीत, असे वर्धन यांनी सांगितले. वर्धन यांनी बिजू जनता दलाचे प्रमुख व ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची रविवारी सकाळी भेट घेतली. उभय नेत्यांमध्ये निवडणुकीपूर्व आघाडीबाबतची प्राथमिक चर्चा झाली.
काँग्रेसविरोधी वातावरण
दिल्लीत आम आदमी पार्टीला 70 पैकी 28 जागी विजय मिळाला. यावरून लोकांना पर्याय हवा आहे, हे स्पष्ट झाले आहे. काँग्रेसच्या विरोधातील वातावरण सध्या सर्वत्र पाहायला मिळत असल्याने तिसर्‍या आघाडीची गरज निर्माण होते. एकूणच पुढील निवडणुकीत काँग्रेसच्या हातून सत्ता जाणार आहे. लोकसभा निवडणुकीत 110 जागा जिंकणे काँग्रेस पक्षासाठी कठीण ठरणार आहे, असे वर्धन यांनी सांगितले.