उदयपूर - डबोक येथील महाराणा प्रताप विमानतळावर रविवारी सकाळी एक धमकीचा फोन आला आणि सुरक्षा यंत्रणा कामाला लागली. फोन करणार्याने, 'आसाराम बापूंना 15 दिवसांमध्ये मुक्त करा, नाहीतर भारतात एकही विमान उडू देणार नाही. संपूर्ण देश उद्धवस्त करुन टाकू.' अशी धमकी दिली आहे. या फोननंतर विमानतळाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
विमानतळ प्राधिकरणाचे विशेष कार्यकारी अधिकारी विनय दाहिमा यांनी डबोक पोलिस स्टेशनमध्ये धमकीच्या फोनची तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिकारी रेवंत दान यांनी सांगितले, की विमानतळाच्या एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) ऑफिसमध्ये लँडलाइनवर मोबाईलवरुन धमकीचा फोन आला होता.
अज्ञात व्यक्तीने तो रायबरेलीचा असल्याचे सांगितले होते. एटीसी ऑफिसमध्ये असिस्टंट मॅनेजर सरोज मीणा यांनी फोन रिसिव्ह केला होता. त्यांनी धमकीची माहिती तत्काळ विनय दाहिमा यांना दिली. पोलिसांनी धमकीच्या फोनचा तत्काळ तपास सुरु केला आणि ज्या मोबाईलवरुन फोन आला होता तो रायबरेलीतील लालगंज येथील राणी खेड्यातून आल्याचे सांगितले आहे. रायबरेलीच्या धर्मेंद्र कुमार याच्या नावावर ते सिम आहे. उदयपूर पोलिस उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने आरोपीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे.
विमान सेवेवर परिणाम नाही
धमकीच्या फोननंतर पोलिसांना त्याची लागलीच माहिती देण्यात आली. त्यांनी तत्काळ कारवाई करत फोन करणार्याचा शोध घेतला आहे. त्यासोबतच विमानतळाची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. विमानतळावर पोलिस आणि सीआयएसएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान सर्व फ्लाइट निर्धारित वेळेनुसार सुरु आहेत.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, धमकीच्या फोननंतर वाढविण्यात आलेली सुरक्षा