रायपूर - छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात रविवारी तीन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. त्यात २०१३ मधील जिराम व्हॅली हत्याकांडातील एका संशयित आरोपीचाही समावेश आहे.
दंतेवाडाचे पोलिस अधीक्षक कामलोचन कश्यप यांनी सांगितले की, जिल्हा राखीव दल, केंद्रीय राखीव पोलिस दल आणि जिल्हा पोलिस यांच्या संयुक्त पथकाने या तीन नक्षलवाद्यांना अटक केली. त्यांच्या डोक्यावर रोख बक्षीस होते. अटक झालेल्यांत बंदी ऊर्फ बंडी (३०) या नक्षलवाद्याचा समावेश आहे. तो उप कमांडर म्हणून कार्यरत आहे. २०१३ मध्ये बस्तरमधील दरभा भागात जिराम व्हॅलीत नक्षलवाद्यांनी हल्ला केला होता. त्यात काँग्रेसचे काही प्रमुख काँग्रेस नेते ठार झाले होते. त्यात बंडूचा सहभाग होता, असा संशय आहे. ११ मार्च २०१४ रोजी तोंगपाल पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तहाकवाडा येथे झालेल्या हल्ल्यात सुरक्षा दलांचे १५ जवान आणि एक नागरिक ठार झाला होता. या हल्ल्यासाठीही बंडू जबाबदार असल्याचा संशय आहे.
नक्षलवाद्यांच्या लष्करी तुकडीचा सेक्शन कमांडर पंडारू पोडियामी (३०) यालाही अटक झाली आहे. २००८ मध्ये ताडकेल जंगलात ६ पोलिसांची हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडासह अनेक नक्षली हल्ल्यांत सहभागी असल्याचा आरोप त्याच्यावर आहे. ताडकेल हल्ल्यात सहा नक्षलवादीही ठार झाले होते. या दोघांच्याही डोक्यावर ३ लाख रुपयांचे बक्षीस होते. नक्षलवाद्यांच्या लष्करी तुकडी क्रमांक १६ चा सदस्य असलेला सुखराम (३८) या नक्षलवाद्यालाही अटक करण्यात आली.