(फाइल फोटो: एका सभेत संबोधित करताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी)
कोलकाता- शारदा चिट फंड घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने शुक्रवारी पश्चिम बंगालचे मंत्री मदन मित्रा यांना अटक केले. त्यामुळे नाराज झालेल्या तृणमूल कॉंग्रेसच्या सुप्रीमो ममता बनर्जी यांनी शनिवारी केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली. मदन मित्रा यांना अटक होऊ शकते मग सुब्रतो राय यांच्यासोबत छायाचित्रात दिसणारे पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनाही अटक व्हायला हवी, असे ममता म्हणाला. मित्रा यांच्या अटकेच्या विरोधात आयोजित एका सभेत त्या बोलत होत्या.
गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये हडपणारे सहाराचे प्रमुख सुब्रतो रॉय यांच्यासोबत अनेक छायाचित्रांमध्ये
पंतप्रधान नरेंद्र मोदी दिसले होते. मग मोदींना का अटक करत नाही? असा सवालही ममतांनी यावेळी उपस्थित केला. दरम्यान, मागील आठ महिन्यांपासून सुब्रतो रॉय तुरुंगात आहेत.
शारदा चिट फंड घोटाळ्याशी आमचा काहीही संबंध नसल्याचा दावा ममता बॅनर्जी यांनी यापूर्वी केला होता. मात्र, त्यानंतर तृणमुल कॉंग्रेसचे दोन खासदारांना अटक झाली होती. आता मात्र, ममतांचे विश्वसनीय मदन मित्रा यांना सीबीआयने अटक केल्याने त्यांना चांगलाच धक्का बसला आहे. केंद्रातील भाजप सरकार येत्या निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून सीबीआयमार्फत आकसाने कारवाई करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.