आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केदारनाथमध्ये आज 45 कोटींची व्हीआयपी पूजा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुप्तकाशी - केदारनाथ मंदिरात तीन महिन्यांनंतर बुधवारी पूजेला सुरुवात होणार आहे. पूजाविधीमध्ये भक्त किंवा स्थानिक पुरोहितांचा सहभाग नसेल. ही शंभर वर्षातील पहिलीच घटना ठरणार आहे. केवळ उत्तराखंड सरकारमधील मंत्री, अधिकारीच या पूजेचे साक्षीदार ठरणार आहेत. धक्कादायक म्हणजे या व्हीआयपी पूजेवर 45 कोटी रुपयांची उधळपट्टी केली जाणार आहे.


राज्यात 16 जूनला महापुराचा फटका बसला होता. त्यानंतर सरकारने केदारनाथ मंदिरातील पूजा पूर्ववत सुरू करण्यालाच अधिक प्राधान्य दिल्याचे दिसून येते. तीन महिन्यांपासून संपूर्ण प्रशासन पूजेचे नियोजन व त्याच्या तयारीत गुंतल्याचे पाहायला मिळाले. रुद्रप्रयागचे जिल्हाधिकारी डी. जावदकरदेखील त्यापलीकडे जाऊ शकले नाहीत. गुप्तकाशी, सोनप्रयाग, फाटासह एकूण चार जिल्ह्यांत पोलिस तैनात करण्यात आले आहेत. पूजेसाठी कोणीही जाऊ नये, याची खबरदारी घेण्यासाठी हा फौजफाटा उभारण्यात आला आहे.


पूजेच्या तयारीमुळे सोनप्रयाग ते गौरीकुंडहून केदारनाथ मंदिराला जाणारा पायी मार्ग तीन महिने उलटूनही बंद स्थितीमध्ये आहे. केदारनाथ मंदिराची पूजा सुरू करण्याची सरकारला झालेली घाई चकित करणारी आहे. मंदिर पूजेच्या माध्यमातून उत्तराखंड सरकार मंदिराचे नव्हे, तर आपलेच शुद्धीकरण करत आहे. त्यामुळेच 11 रोजी होणा-या पूजेत केवळ मंत्री, अधिकारीच हजेरी लावणार आहेत.


नातेवाइकांची डीएनए तपासणी
महापुराच्या संकटात बेपत्ता झालेल्या भाविकांच्या नातेवाइकांची डीएनए तपासणी करण्यात यावी. जेणेकरून बेपत्ता झालेल्या भाविकांची माहिती मिळू शकेल. त्यासाठी उत्तराखंडच्या पोलिस महासंचालकांनी आंध्र प्रदेशच्या पोलिसांना एक पत्र पाठवून नमुने देण्याची मागणी केली आहे.