आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्षाबंधनाला बहिणींना देणार शौचालयाची भेट, भावांचा बहिणीसाठी पुढाकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेठी- रक्षाबंधनाच्या सणाला बहिणी भावाच्या दीर्घायूची कामना करत त्याच्या मनगटावर राखी बांधतात. या सणाच्या प्रथेनुसार प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीला  भेटवस्तू देतो. यंदा उत्तर प्रदेशच्या अमेठीमध्ये रक्षाबंधनाचा हा उत्सव वेगळ्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. येथील बंधुराया त्यांच्या बहिणींना शौचालय भेट देणार आहेत. 

ही संकल्पना अमेठीच्या सीडीओ अपूर्वा दुबे यांनी मांडली असून त्यास ‘अनोखी अमेठी का अनोखा भाई’ नावाने स्पर्धेचे रूप दिले आहे. यात कला आणि शौचालय या दोन प्रकारांत स्पर्धा होईल. कला स्पर्धेत इयत्ता सहावी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी सहभागी होतील, तर शौचालय स्पर्धेत जिल्ह्यातील १३ मंडळांतील ८९४ भावांनी नोंदणी केलेली आहे. नोंदणी केलेले हे सर्व भाऊ रक्षाबंधनाला त्यांच्या बहिणींना शौचालय भेट देतील. यासाठीचा खर्चही ते स्वत:च करणार आहेत. 

५० हजारांचे पहिले बक्षीस  
सीडीओ अपूर्वा दुबे यांच्या मते, अमेठीत १५९ शौचालये बांधून तयार झाली असून या स्पर्धेची ११ ऑगस्टपर्यंत मुदत आहे. ११ ते १४ ऑगस्टदरम्यान चमू भावांनी बांधलेल्या शौचालयांची गुणवत्ता व दर्जा तपासेल. स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात या स्पर्धेची पारितोषिके वितरित केली जातील.  

शौचालये बांधून बहिणींची लाज वाचवायची आहे  
देशात पहिल्यांदाच  अशी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी संपूर्ण अमेठी जिल्ह्यात बॅनर आणि पोस्टर लावण्यात आले आहेत. ‘बहनों की गुहार, भाईयों से मांगा शाैचालय इस बार’, ‘बहनों की लाज बचाना है, घर में शौचालय बनाना है’ अशी घोषवाक्ये स्वच्छ भारत व्यवस्थापन समितीकडून जारी करण्यात आली आहेत.   

गुन्हेगारीला चाप बसेल : जिल्हाधिकारी  
अमेठीचे जिल्हाधिकारी योगेशकुमार यांनी सांगितले की, सुरक्षा आणि स्वच्छतेला चालना देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. यामुळे घरातील महिलांना शौचास बाहेर जावे लागणार नाही. त्यामुळे त्यांच्यासोबत काही अनुचित प्रकार घडणार नाही आणि गुन्हेगारीलाही चाप बसेल.  

११ वर्षीय सिद्धार्थ थोरल्या बहिणीला देणार भेट  
या स्पर्धेसाठी लहानमोठी सर्वच वयाची भावंडे सरसावली आहेत. गौरीगंजच्या एसपीएस मेमोरियल स्कूलमध्ये पाचव्या वर्गात शिकत असलेल्या ११ वर्षीय सिद्धार्थ सिंह हा मुलगाही स्पर्धेत सहभागी झाला आहे. तो त्याच्यापेक्षा मोठी असलेली बहीण नीतूसाठी शौचालय बांधणार आहे. शौचालय नसल्यामुळे तिला उघड्यावर जावे लागते हे मला पाहावले नाही म्हणून मी शौचालय बांधतोय, असे सिद्धार्थने म्हटले आहे.  

अमेठीत शौचालयांची दुरवस्था  
केंद्रीय पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यातील २.६३ टक्के गावांतच शौचालये आहेत. २०१५-१७ च्या आकडेवारीनुसार ७६८३ शौचालये बांधण्यात आली, तर २,०६,९५९ शौचालये बांधायची आहेत.
बातम्या आणखी आहेत...