लखनौ- 'सबका मालिक एक है' अशी शिकवण देणारे शिर्डीचे साईबाबांच्या पुजेवरून सुरु झालेल्या वादाला आता वेगळे वळण लागले आहे. या वादात आता जुन्या आखाड्याचे पायलट बाबांनी उडी घेतली आहे. शंकराचार्य हिंदू धर्माला अधोगतीच्या मार्गाने घेऊन जात असल्याचा आरोप एका आखाड्याच्या नागा साधूंनी केला आहे. साईबाबा देव नसून त्यांची पूजा करू नये, असे वादग्रस्त वक्तव्य द्वारका पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी केले होते.
एका इंग्रजी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, जुन्या आखाडाचे महामंडलेश्वर पायलट बाबांनी म्हटले, की शंकराचार्य हे हिंदू धर्माला अधोगतीच्या मार्गाने घेऊन जात आहेत. अन्य नागा साधुंनी स्वरूपानंद यांच्या आदेशाचे पालन करू नये, असेही पायलट बाबांनी आवाहन केले आहे. उल्लेखनिय म्हणजे पायलट बाबा साधु बनण्यापूर्वी एक प्रोफेशनल पायलट होते.
यापूर्वी शंकराचार्य यांनी प्रयाग आणि हरिद्वारध्ये साईभक्तांविरोधात मोहिम सुरु करण्यास सांगितले होते. शंकराचार्य यांच्याकडून नागा साधू आणि साई बाबांच्या अनुयायींमध्ये गृहयुद्ध लावण्याचा प्रयत्न केला जात असून हे फार चिंताजनक आहे. स्वत:चा अहंकार संतुष्ट करण्यासाठी शंकराचार्य हे नागा साधूंचा वापर करत आहे. ते हिंदू धर्मासाठी फारच घातक ठरू शकते, असे पायलट बाबांनी म्हटले आहे.
एखाद्या व्यक्तीची कोणावर श्रद्धा असेल. परंतु, आपण त्या दोघांमध्ये येऊ शकत नाही. विशेष म्हणज आपण त्याच्या अधिकारावर गदा आणू शकत नाही. ही एक प्रकारची हिंसा असल्याचेही पायलट बाबांनी सांगितले. आम्ही साईबाबांच्या अनुयायींना त्यांची भक्ती करण्यावर प्रतिबंध घालू शकत नाहीत.
(फोटो: द्वारका पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती)