आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नितीशकुमार आज घेणार सलग तिसऱ्यांदा बिहारच्‍या मुख्यमंत्रिपदाची शपथ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा- बिहार विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळवून भाजपला चारीमुंड्या चित करणारे नितीशकुमार शुक्रवारी सलग तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. हा सोहळा आता केवळ शपथविधी सोहळा न राहता आगामी काळातील भाजपविरोधी महाआघाडीची पायाभरणी ठरणार असल्याने यातील सर्व संभाव्य घटक पक्षांचे नेते सोहळ्यास उपस्थित राहतील.

या सोहळ्यास काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, नॅशनल काॅन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला व काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे व गुलाम नबी आझाद यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. बिहारमध्ये आक्रमक प्रचार करून सत्ता काबीज करण्याचे स्वप्न पाहणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नितीश यांनी या सोहळ्याचे निमंत्रण दिले असले तरी त्यांच्याऐवजी केंद्रीय मंत्री ए. व्यंकय्या नायडू आणि राजीवप्रताप रुडी पाटण्यात दाखल होतील.

याशिवाय उद्याच्या नव्या संभाव्य आघाडीशी संबंधित सर्व बडे चेहरे शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहतील, असे मानले जात असले तरी राज्यनिहाय राजकीय परिस्थिती व स्थानिक प्रश्नांचा विचार करता अनेक नेते येण्याचे टाळतील, असा राजकीय निरीक्षकांचा होरा आहे. दिल्लीसह विविध राज्यांचे मुख्यमंत्री व डाव्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.

शपथविधीनंतर चहापाणी
शपथविधी सोहळ्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी विशेष चहापान आयोजित करण्यात आले असल्याने ही नव्या महाआघाडीची पायाभरणी असल्याचे राजकीय निरीक्षकांना वाटते.

शिवसेनेची उपस्थिती चर्चेत
महाराष्ट्रात भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या वतीने रामदास कदम व सुभाष देसाई सोहळ्यात उपस्थित राहणार असल्याने त्यांची उपस्थिती लक्षणीय ठरेल. शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांना नितीश यांनी निमंत्रण दिले होते. मात्र, त्यांनी काही कारणास्तव आपण येऊ शकणार नसल्याचे कळवले आहे.