गांधीनगर - केंद्र सरकारच्या प्रभावी निर्णयांमुळे देशात १३० अब्ज डॉलर्सची परकीय गुंतवणूक झाली आहे. हे मोठे यश आहे. त्यातून देशातील उद्योग क्षेत्रातील वातावरणातही सुधारणा झाली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
व्हायब्रंट गुजरात परिषदेत मोदी यांनी मंगळवारी मार्गदर्शन केले. मोदी म्हणाले, ‘मेक इन इंडिया’ हा देशाचा सर्वात मोठा ब्रँड बनला आहे. देशात यापूर्वी कधीही असे घडले नव्हते. त्यामुळेच गेल्या अडीच वर्षांत देशात १३० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाली आहे. आताची गुंतवणूक ही त्या पूर्वीच्या दोन आर्थिक वर्षांच्या तुलनेत ६० टक्क्यांनी अधिक आहे. थेट परकीय गुंतवणुकीच्या सरकारच्या योजनेत अनेक देशांनी सहभाग घेतला आहे. त्यामुळे भारताला आशिया-प्रशांत प्रदेशातील गुंतवणुकीची राजधानी असा अल्पावधीत गौरव प्राप्त झाला आहे. त्यामागे सततचा परकीय गुंतवणुकीचा आेघ कारणीभूत ठरला आहे. सरकारने अनेक क्षेत्रात एफडीआयवर भर दिला आहे. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था इतर देशांसाठी खुली आहे. त्याचा देशाच्या विकासात सर्वार्थाने फायदा होणार आहे. सरकारने परदेशी गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यासाठी आपल्या धोरणात अनेक बदल केले आहेत.
लॉजिस्टिक्सच्या बाबतीत देश १९व्या स्थानी
ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स २०१६ मध्ये भारत १९ व्या स्थानावर आहे. जागतिक बँकेच्या लॉजिस्टिक्स परफॉर्मन्स इंडेक्स २०१६ मध्ये भारताने हे स्थान मिळवले. त्यामुळे परदेशी गुंतवणूकदार भारताकडे आकर्षित होत आहेत. स्टार्ट अप्सला प्रोत्साहन देणारे वातावरण देशात निर्माण होत असल्याचे पंतप्रधान मोदी या वेळी बोलताना म्हणाले. नोटबंदीनंतर एकट्या गुजरातमध्ये सुमारे १५ लाख बँक खाती उघडण्यात आली आहेत, अशी माहिती गुजरातचे मुख्यमंत्री िवजय रुपानी यांनी परिषदेत दिली. राज्यात ७० लाखाहून अधिक नागरिकांनी रुपे डेबिट कार्ड वापरण्यास सुरुवात केली आहे.