आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two Crpf Officials Killed, 12 Injured In Naxal Attack At Chhattisgarh

घातपात: नक्षलवाद्यांच्या साखळी स्फोटात डेप्युटी कमांडंटसह दोघे शहीद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुकमा/बिजापूर/दंतेवाडा- आंध्र प्रदेशच्या सीमेवर भेज्जी परिसरात रविवारी सकाळी नक्षलविरोधी मोहिमेवर निघालेल्या सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर नक्षलवाद्यांनी घात लावून केलेल्या हल्ल्यात डेप्युटी कमांडंटसह दोघेजण शहीद झाले. या पथकावर माओवाद्यांकडून गेल्या काही दिवसांत झालेला हा सलग तिसरा मोठा हल्ला आहे. दरम्यान, छत्तीसगडमध्ये बिजापूर केंद्रीय राखीव पोलिस दलाने कारवाई करुन एका महिलेसह तीन नक्षलींचा खात्मा केला.

आंध्र प्रदेश - छत्तीसगड सीमेवर भेज्जी परिसरात घनदाट जंगलात बुधरा येथे एका झोपडीत संशयास्पद कारवाया सुरू असल्याची माहिती सीआरपीएफच्या जवानांना मिळाली. जवानांनी त्या परिसराची नाकेबंदी केली. काही अधिकारी आणि जवान हळूहळू झोपडीकडे जात असताना नक्षलवाद्यांनी तीन मोठे शक्तीशाली भूसुरुंगांचे स्फोट घडवले. हे तिन्ही स्फोट एकाचवेळी झाल्याने जवानांना सावरण्याची संधीच मिळाली नाही. हल्ल्यात सीआरपीएफचे डेप्युटी कमांडंट मोहंमद निहाल आलम व आरक्षक राजू रावत हे गंभीर जखमी झाले. काही मिनिटांतच त्यांचा मृत्यू झाला. हल्ल्यात डेप्युटी कमांडंट रत्नेश्वर यांच्यासह आई जवान व अधिकारी जखमी झाले.

गेल्या वर्षी 25 मे रोजी नक्षलींनी दरभा जंगलात मोठा घातपाती हल्ला केला होता. त्यानंतरचा हा सर्वात मोठा हल्ला म्हटला जात आहे. नक्षली हल्ला व स्फोटात गंभीर जखमी झालेल्या जवानांना तातडीने जंगलातून बाहेर काढण्यात आले व भेज्जी येथील सीआरपीएफच्या तळावर नेण्यात आले. तेथून त्यांना हेलिकॉप्टरने रायपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु निहाल आणि राजू यांचा त्याआधीच मृत्यू झाला होता. हल्ल्यात जखमी झालेले भेज्जी ठाण्याचे अधिकारी हृदय वर्मा यांची प्रकृतीही गंभीर असल्याचे सूत्रांनी सांगितले.

खोटी माहिती पेरून नक्षलवाद्यांनी फसवले
सीआरपीएफचे नक्षलविरोधी पथक कोब्राने भेज्जी व परिसरात रविवारपासून अभियान सुरू केले होते. यात जिल्हा पोलिसांसह 400 जवान सहभागी झाले होते. वेगवेगळ्या मार्गांनी हे जवान जंगलात घुसले. चिंतागुफा ठाणे परिसर हा नक्षलींचा गड मानला जातो. तेथील कारवायांची माहिती पथकाला मिळाली होती. बुधरा गावाजवळ झोपडीत नक्षलवादी स्फोटकांचा कारखाना चालवत असल्याची खोटी माहिती जवानांची दिशाभूल करण्यासाठी नक्षलींनी त्यांच्यापर्यंत पोहोचवली होती. या माहितीच्या आधारे तिकडे जात असलेल्या तुकड्यांवर नक्षलींनी भूसुरुंग पेरून हल्ला चढवला.

बिजापूरमध्ये चकमक; तीन नक्षली ठार
छत्तीसगडमध्ये फरसेगड भागात शनिवारी सायंकाळी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत एका महिलेसह तीन नक्षलवादी ठार झाले.जिल्हा पोलिस (छत्तीसगड) तसेच व गडचिरोली (महाराष्ट्र) पोलिसांची संयुक्त तुकडी सहा फेब्रुवारी रोजी गस्त घालण्यासाठी गेली होती. तिसर्‍या दिवशी सायंकाळी पाचच्या सुमारास या पथकावर बडेकांकलेरच्या जंगलात दडून बसलेल्या नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. जवानांनीही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. सुमारे तासभर दोन्ही बाजूंनी तुफान गोळीबार सुरू होता. काही वेळाने नक्षलवादी पळून गेले. गस्त पथकाला चकमक झाली त्या ठिकाणी एका महिलेसह दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह मिळाले. तसेच मोठय़ा प्रमाणात शस्त्रसाठाही सापडला. हल्ल्यात मारली गेलेला नक्षली भैरमगड येथील पल्लेवाया येथील होता व त्याचे नाव चैतू ऊर्फ नवी मडावी (38) असे होते. त्याच्यावर एक लाख रुपयांचे बक्षीस होते. या हल्ल्यात त्याच्या पत्नीसह आणखी एक सहकारी ठार झाला. या हल्ल्यानंतरही जंगलात नक्षलवाद्यांच्या शोधार्थ गस्त मोहीम सुरूच ठेवली जाणार असल्याचे सुरक्षा विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले. एका विशेष अभियानाअंतर्गत ही सर्च मोहिम सुरू करण्यात आली आहे.