आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two Sangh Leaders Race In The Goa Chief Ministreship, Parrikar Get Promotion

गोव्यात मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत संघाचे दोन नेते, मनोहर पर्रीकरांच्या बढतीने चर्चेला उधाण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: लक्ष्मीकांत पार्सेकर आणि राजेंद्र आर्लेकर
पणजी - केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा असतानाच मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीलाही वेग आला आहे. गोव्याचा नवा मुख्यमंत्री ठरवण्यासाठी भाजपची गुरुवारी उशिरा बैठक होणार आहे. दुसरीकडे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दोन नेत्यांची मोठी दावेदारी असल्याचे सांगण्यात येते.

मनोहर पर्रीकर सध्या राजधानीत मुक्काम ठोकून आहेत. त्यांच्या समवेत गोवा प्रांताध्यक्ष विनय तेंडुलकरही आहेत. मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय या बैठकीत घेतला जाणार आहे. तत्पूर्वी, पर्रीकर यांनी बुधवारी भाजपाध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यात मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी रात्री उशिरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती; परंतु बैठकीत केवळ गोव्याबद्दल चर्चा झाल्याचे त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले. पर्रीकरांना संरक्षण खाते मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गुरुवारच्या बैठकीत मात्र पर्रीकर यांच्या जागी कोणत्या उमेदवाराची निवड करायची, यावर विचार विनिमय केला जाईल, असे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.

विधानसभा अध्यक्ष
भाजपमधील ज्येष्ठ नेते लक्ष्मीकांत पार्सेकर आणि राजेंद्र आर्लेकर यांची नावे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. पारसेकर आरोग्यमंत्री आहेत. आर्लेकर विधानसभेचे अध्यक्ष आहेत. दोन्ही नेत्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी आहे. सध्या दोन्ही नेत्यांकडे पक्षाची राज्यातील धुरा आहे. पार्सेकर आणि आर्लेकर हे दोन्ही नेते पर्रीकर यांच्या निकटवर्तीयांपैकी मानले जातात. गोव्यातील पक्ष संघटना मजबूत करण्यामध्ये दोन्ही नेत्यांचे योगदान मानले जाते. त्यामुळेच महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी आणि काँग्रेस यांच्याशी भाजपने यशस्वी संघर्ष केला. पार्सेकर मंडरेम मतदारसंघाचे आमदार आहेत.

शर्यतीत नाही -पार्सेकर
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारण्यास तयार आहे; परंतु मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही. पक्षाचा निर्णय मला मान्य राहील, असे पार्सेकर यांनी म्हटले आहे.

तर जबाबदारी स्वीकारेन -आर्लेकर
अद्याप तरी यासंबंधी तशी चर्चा नाही; परंतु पक्षाने जबाबदारी दिल्यास मुख्यमंत्रिपदासाठी माझ्यातील सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करेल, असे आर्लेकर म्हणाले.