आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रपती निवडणूक: सपत दोन तट; मुलायम-अखिलेश प्रतिस्पर्धी उमेदवाराला मतदान करण्‍याच्या तयारीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ- राष्ट्रपती निवडणुकीवरून समाजवादी पक्षात दोन तट पडल्याचे चित्र रविवारी निवडणुकीच्या पूर्वसंध्येला दिसले. पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मुलायमसिंह यादव आणि पक्षाध्यक्ष अखिलेश यादव यांचे गट प्रतिस्पर्धी उमेदवारांना मतदान करण्याच्या तयारीत असल्याने पक्षात क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता आहे. पक्षातील फुटीमुळे निवडणुकीच्या निकालावर कुठलाही परिणाम होण्याची शक्यता नाही, पण त्यामुळे यादव कुटुंबीयांमधील वाद निश्चितपणे चिघळणार आहे, असे मत सपातील सूत्रांनी सांगितले.
  
राष्ट्रीय लोकशाही आघाडीने रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपतिपदाची उमेदवारी जाहीर केल्यापासूनच या मुद्द्यावर समाजवादी पक्षातील मतभेद स्पष्ट झाले होते. कोविंद यांचे नाव जाहीर झाल्यानंतर लगेचच मुलायमसिंह यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानाप्रीत्यर्थ २० जून रोजी आयोजित भोजन समारंभाला हजेरी लावली होती. त्यातून मुलायम यांचा रालोआच्या उमेदवाराला पाठिंबा असल्याचे स्पष्ट संकेत राजकीय वर्तुळात गेले होते. मात्र, या भोजन समारंभाला अखिलेश आणि मायावती हे दोघेही अनुपस्थित होते. त्यांनी विरोधी पक्षांच्या उमेदवार मीरा कुमार यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे. 

रामनाथ कोविंद हे ‘भक्कम उमेदवार’ आहेत, अशी जाहीर प्रतिक्रिया मुलायमसिंह यांनी व्यक्त केली होती. त्याच वेळी ते कोविंद यांना मत देण्याच्या बाजूचे आहेत, असा निष्कर्ष काढण्यात आला होता. ‘रामनाथ कोविंद हे चांगले उमेदवार आहेत. माझे त्यांच्याशी खूप जुने संबंध आहेत. भाजपने भक्कम उमेदवार निवडला आहे. त्यापेक्षाही सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजपकडे बहुमत आहे,’ अशी प्रतिक्रिया मुलायमसिंह यांनी व्यक्त केली होती.मुलायमसिंह यांचे बंधू शिवपाल यादव यांनीही मुलायम यांचीच री ओढून कोविंद यांना पाठिंबा देण्याचे संकेत दिले होते.  दुसरीकडे यूपीएच्या उमेदवार मीरा कुमार यांनी मायावती यांची भेट घेण्याआधी अखिलेश यादव यांची समाजवादी पक्षाच्या मुख्यालयात भेट घेतली होती.

मीरा कुमार यांनाच मतदान करण्याचे अखिलेश यांचे आदेश 
समाजवादी पक्षाचे प्रवक्ते राजेंद्र चौधरी यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, मीरा कुमार यांना मतदान करा, असे आदेश अखिलेश यादव यांनी पक्षाच्या आमदारांना दिले आहेत. पक्षाचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते रामगोविंद चौधरी म्हणाले की, ‘प्रत्येकाने मीरा कुमार यांना पाठिंबा दिला पाहिजे.’

नेताजी जो कहेंगे वही करेंगे : शिवपाल
दुसरीकडे, आपण तसेच समाजवादी पक्षाचे अनेक आमदार आणि खासदार रामनाथ कोविंद यांना मतदान करणार आहोत, अशी घोषणा शिवपाल यादव यांनी वाराणसीत केली होती. ‘कोविंद यांचे नेताजींशी (मुलायमसिंह) चांगले संबंध आहेत. ते चांगली व्यक्ती आहेत आणि उत्तम उमेदवार आहेत. नेताजी जो कहेंगे वही होगा,’ असे शिवपाल म्हणाले होते.