आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two Terrorist Imran,Firoz Both Resident Of Maharashtra

धर्मशाला येथे रेकी करणारे अतिरेकी इम्रान, फ‍िरोज दोघेही महाराष्‍ट्रातील रहिवाशी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धर्मशाला - इंडियन मुजाहिदीन दहशतवादी संघटनेचा सहसंस्थापक यासीन भटकळचे दोन साथीदार इम्रान आणि फिरोज यांनी धर्मशालामध्ये येऊन रेकी केली होती. इम्रान महाराष्‍ट्रातील नांदेडचा, तर फिरोज पुण्याचा रहिवासी आहे. दोघा जणांनी मार्च-एप्रिलमध्ये येथे येऊन या परिसराची टेहळणी केली होती.
राष्‍ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यासीन भटकळच्या चौकशीतून दहशतवादी कट उघडकीस आला आहे. त्यांचा पुढील निशाणा धर्मशाला होते. भटकळ धर्मशालात येऊ शकतो याचा तपास यंत्रणेला आधीपासूनच अंदाज होता. मात्र, भटकळ येथे येण्याआधीच त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. इम्रान व फिरोजने चर्चा केलेल्या व्यक्तींची माहिती घेतली जात आहे.
राज्य पोलिसांना माहिती पाठवली
या प्रकरणाचा तपास करणा-या एनआयएने भटकळच्या साथीदारांची माहिती राज्य पोलिसांकडे पाठवली आहे. राज्य पोलिस मुख्यालयाने भटकळच्या अटकेनंतर एनआयएकडे भटकळने दिलेली माहिती पुरवण्याची विनंती केली होती. धर्मशालाच्या प्रवासादरम्यान इम्रान व फिरोजने भेट दिलेली ठिकाणे व व्यक्तींची माहिती गोळा केली जात आहे. राज्य पोलिसांनी जिल्हा प्रशासनाला यासंदर्भात आदेश जारी केला आहे.
अधिका-यांचा बोलण्यास नकार
इंडियन मुजाहिदीनचा सहसंस्थापक अतिरेकी यासीन भटकळशी संबंधित हे प्रकरण आहे. या संवेदनशील प्रकरणावर कुठलीही प्रतिक्रिया देण्यास अधिका-यांनी नकार दिला आहे. मात्र, जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या सूचना फलकावर इंडियन मुजाहिदीनच्या दोन अतिरेक्यांची छायाचित्रे चिकटवण्यात आली आहेत.
लामांवर हल्ल्याच्या तयारीत होता भटकळ
काही दिवसांपूर्वी पकडण्यात आलेल्या यासीन भटकळचे पुढील लक्ष्य हिमाचल प्रदेशातील धर्मशालामध्ये स्फोट घडवणे हे होते. गुप्तचर संस्थेच्या एका अधिका-याने सांगितले की, धर्मशालामध्ये दलाई लामा व बौद्ध धर्माच्या संस्थांवर स्फोट करण्याचा कट होता. त्याचा मनसुबा यशस्वी होण्याआधीच भटकळला अटक करण्यात आली.
म्यानमारची परतफेड करण्यासाठी कट
म्यानमारमध्ये रोहिंग्या मुस्लिमांवर बौद्धांनी केलेल्या हल्ल्याचा सूड उगवण्यासाठी धर्मशालामध्ये स्फोट होऊ शकतो, असा इशारा गुप्तचर विभागाने दिला होता. दहशतवादी संघटना अल कायदाने त्यासाठी इंडियन मुजाहिदीनकडे जबाबदारी सोपविली होती.
आखाती देशात हल्ल्याची योजना तयार
केंद्रीय सुरक्षा संस्थेनुसार, भटकळच्या आधी धर्मशालेत आलेले दोन अतिरेकी अल कायदाचे होते. त्यांनी काही ठिकाणांची रेकीही केली. मात्र, स्फोट यशस्वी करण्यासाठी भटकळ येथे येऊ इच्छित होता. त्यानेच दोघांना येथे पाठवले. धर्मशालाच्या स्फोटाची योजना या वर्षी जानेवारी महिन्यात एका आखाती देशात तयार करण्यात आली होती. या बैठकीस यासीन भटकळ उपस्थित होता. नंतर त्याला नेपाळ सीमेवर पकडण्यात आले. एनआयएने त्याच्याकडून महत्त्वपूर्ण माहिती प्राप्त केली आहे.