आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुतण्या अखिलेश समर्थकांची काकाकडून पक्षातून हकालपट्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - उत्तर प्रदेशमध्ये सत्ताधारी समाजवादी पक्षातील कलह मिटण्याची चिन्हे दिसत नाहीत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शिवपाल यादव यांनी सोमवारी पुतण्या आणि मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे अत्यंत जवळचे समर्थक तीन आमदार आणि चार पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. त्यामुळे काका-पुतण्यांतील संघर्ष अजूनही मिटलेलाच नाही हे स्पष्ट झाले आहे.

विधान परिषदेचे आमदार सुनीलसिंग साजन, आनंद भदौरिया आणि संजय लाटहार या तीन आमदारांना पक्षातून हाकलण्यात आले आहे. त्याचबरोबर पक्षाच्या युवक शाखेचे प्रदेशाध्यक्ष मोहंमद इबाद, समाजवादी पक्षाच्या यूथ ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ब्रिजेश यादव, सपाच्या यूथ ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष गौरव दुबे आणि छात्र सभेचे प्रदेशाध्यक्ष दिग्विजयसिंग देव यांनाही पक्षातून काढून टाकण्यात आले आहे. पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंग यादव यांच्याविरोधात वक्तव्य करणे, पक्षविरोधी कारवायांत सहभाग आणि बेशिस्त असे आरोप त्यांच्यावर ठेवून ही कारवाई करण्यात आली.

उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद हाती घेतल्यानंतर शिवपाल यादव यांनी रविवारी पक्षाचे ज्येष्ठ नेते रामगोपाल यादव यांचा भाचा अरविंद प्रताप यादव तसेच इटावातील एक पदाधिकारी अखिलेशकुमार यादव यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. त्यांच्यावर जमिनी बळकावल्याचा तसेच अशाच प्रकारच्या कारवायांत सहभागी असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. शिवपाल यांच्या या कारवाईमुळे पक्षातील संघर्षाच्या आगीत पुन्हा तेल पडू शकते.
अखिलेश यांच्याकडून प्रदेशाध्यक्षपद काढून घेतल्यानंतर राज्यात ठिकठिकाणी निदर्शने झाली होती. तसेच अखिलेश यांच्या समर्थनार्थ वक्तव्ये देण्यात आली होती. त्यामुळेच भदौरिया आणि एबाद यांच्यावर कारवाई करण्यात आली, अशी माहिती समाजवादी पक्षातील सूत्रांनी दिली. भदौरिया आणि साजन यांना गेल्या वर्षी डिसेंबरमध्येही बेशिस्तीच्या आरोपावरून पक्षातून काढण्यात आले होते, पण अखिलेश यांनी मध्यस्थी केल्यानंतर त्यांना पुन्हा पक्षात घेण्यात आले होते. त्या वेळीही विधान परिषदेच्या निवडणुकीत गटबाजी चव्हाट्यावर आल्याने यादव कुटुंबीयांमधील संघर्ष उघड झाला होता.

मुख्यमंत्री अखिलेश यांनी सार्वजनिक बांधकाम वगळता इतर सर्व खाती शिवपाल यांच्याकडे सोपवल्यानंतर तसेच प्रदेशाध्यक्षपदासाठी त्यांना पूर्ण पाठिंबा देऊ, असे आश्वासन दिल्यानंतर उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्षातील संघर्ष गेल्या शनिवारीच निवळला होता. प्रदेशाध्यक्षपदावरून अखिलेश यांना हटवून शिवपाल यांची नियुक्ती झाल्याने दोघांमध्ये सत्तासंघर्ष सुरू झाला होता.

युवक आघाडी पदाधिकाऱ्यांनी दिले सामूहिक राजीनामे
शिवपाल यांनी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ पक्षातील विविध आघाड्यांतील युवक पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. ब्रिजेश यादव म्हणाले की, ‘अखिलेश यादव हेच आमचे निर्विवाद नेते आहेत. आम्ही त्यांच्याच नेतृत्वात राजकारणात प्रवेश केला आहे. आम्ही कुठलाही शिस्तभंग केलेला नाही. आम्ही त्यांच्यासाठी आमचे प्राणही देऊ शकतो.’ अशीच भावना व्यक्त करताना ब्रिजेश म्हणाले की, मुलायमसिंग यांच्या धोरणांवर आमचा पूर्ण विश्वास आहे. आम्ही फक्त अखिलेश यांच्या बाजूने आहोत, असे नेताजींना सांगितले आहे.

टीव्ही प्रक्षेपण टॉवरवर चढून कार्यकर्त्यांचा निषेध
व्हीव्हीआयपी गेस्ट हाऊसमध्ये मोठे नाट्य अनुभवायला मिळाले. तेथे सपाच्या छात्र सभेच्या दोन युवक कार्यकर्त्यांनी टीव्ही प्रक्षेपण टॉवरवर चढून नेत्यांच्या हकालपट्टीचा निषेध केला. इतर जिल्ह्यांतही या निर्णयाला विरोध होत आहे. दरम्यान, सात नेत्यांच्या हकालपट्टीचा निर्णय घेतल्यानंतर शिवपाल यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी बंदद्वार चर्चा केली. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीसाठीच्या व्यूहरचनेवर चर्चा करण्यासाठी शिवपाल यांनी मंगळवारी आमदार आणि जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.
बातम्या आणखी आहेत...