बंगळुरू - राम मंदिर प्रकरणात केंद्र सरकार हिंदूत्ववादी नेत्यांच्या सांगण्यावरून नव्हे तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसारच कारवाई करेल, असे मत केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी व्यक्त केले आहे. या प्रकरणावरुन जनशक्ती पक्ष आणि भारतीय जनता पक्षादरम्यान कोणतेही मतभेद होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे स्पष्टीकरणही त्यांनी या वेळी दिले. दरम्यान, पंतप्रधान मोदींची स्तुती करत पासवान म्हणाले, पंतप्रधान मोदी यांचे विकासाचे राजकारण आहे. भाजपची सरकार आल्यापासून मागच्या अडीच वर्षांत त्यांनी आतापर्यंत एकदाही राम मंदिर, बाबरी मशीद, समान नागरी कायदा किंवा कलम ३७० वरून एकदाही चर्चा केली नाही. देशाचा विकास हेच त्यांच्यापुढील एकमेव ध्येय आहे. युवकांमध्ये पसरलेल्या असंतोषाचे समाधान आणि अांतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिष्ठा मजबूत करणे याकडे त्यांचे लक्ष आहे. पंतप्रधानाच्या रूपात आपली जबाबदारी इतक्या चोखपणे मोदींशिवाय अन्य कोणीही पार पाडू शकत नाही.
राहुल यांच्यावर टीका
एका प्रश्नाच्या उत्तरात पासवान म्हणाले, जीएसटी विधेयकातील करमर्यादा ठरवण्याची मागणी करण्याचा राहुल गांधी यांना काहीच नैतिक अधिकार नाही. कारण, यूपीए सरकारच्या कार्यकाळात जीएसटीवर काहीच केले नाही. राज्यसभेतील बहुमताचा दुरुपयोग करून जीएसटी विधयेक मंजूर न होऊ देणे हे साफ चुकीचे असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, जीएसटी मुद्यावरून काँग्रेस आणि भाजप यांच्यात कुणाची प्रतिमा ढासळतेय, असा प्रश्न पासवान यांना या वेळी विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, या प्रकरणी काँग्रेसपेक्षा देशाची प्रतिमा मलिन होत आहे हे महत्त्वाचे आहे.