राजकोट - गुजरातमध्ये विवाह समारंभात गरबा खेळण्याची परंपरा आहे, परंतु राजकोटमध्ये एक आगळा विवाह समारंभ पार पडला. गरब्याच्या जागी येथे क्रिकेटचा सामना रंगला. अनेकदा विवाह समारंभात छोट्या गोष्टीवरून कटुता यायला लागते. म्हणूनच दोन्ही कुटुंबांनी क्रिकेट खेळून नवीन नात्याच्या आरंभीच खिलाडूवृत्तीचा प्रत्यय आणून देण्याचा संकल्प केला आहे.
राजकोटच्या गोंडल गावात हार्दिक कालरिया आणि ध्वनी डढाणिया यांचा अनोखा विवाह ४ जून रोजी होणार आहे. दोन्ही कुटुंबे परस्परांना चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी या निमित्ताने एकत्र आली होती. कालरिया कुटुंबाच्या संघाला कालरिया नाइट रायडर्स (केकेआर) आणि डढाणिया कुटुंबाचे डढाणिया डेेअरडेव्हिल्स (डीडी) अशी नावे देण्यात आली होती. मंगळवारी पार पडलेल्या सामन्यात डीडीने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करताना ४ गडी गमावून १७० धावा काढल्या. केकेआरला त्याचा १५५ धावांपर्यंतच पाठलाग करणे शक्य झाले. वधू ध्वनीने १२ धावा काढल्या आणि वर हार्दिकने दोन गडी बाद केले. हार्दिकने आपल्या संघासाठी ३० धावा काढल्या.
३१ चेंडूंत ११८ धावा काढून प्रियांक सामनावीर ठरला. दोन्ही कुटुंबात क्रिकेटचे वेड पाहायला मिळते, हे वेगळे सांगायला नकोच. त्यामुळे विवाहाच्या निमित्ताने क्रिकेट सामन्याचे आयोजनास दोन्ही कुटुंबांनी सहमती दर्शवली होती. त्यासाठी नियम देखील अगदी व्यावसायिक सामन्यासारखे ठेवण्यात आले होते. विशेषत: समालोचक, स्कोरर, एलइडीमध्ये स्कोअर दाखवले जात होते. चिअर लीडर देखील ठेवण्यात आल्या होत्या. दहा-दहा षटकांच्या या सामन्यांत डढाणीया डेअरडेव्हिल्सने ११ हजार रुपयांचे बक्षीस मिळवले.
सामना संपल्यानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये टग ऑप वॉर हा खेळ खेळण्यात आला. त्यात एक दोरी ठेवण्यात आली होती. ही दोरी आपल्याकडे आेढायची होती. या खेळात केकेआरने बाजी मारली. असेच अनेक रंजक खेळ घेण्यात आले.