आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जातीयवादी विरोधी पक्षांना विकास बघवत नाही, योगी आदित्यनाथ यांचा विरोधकांवर हल्‍लाबोल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बलिया - जातीयवादाच्या नावाखाली लुटणाऱ्यांना राज्याची विकासाकडे होणारी वाटचाल पाहवली जात नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर हल्ला चढवला.   
विरोधी पक्षांनी राज्याला गेल्या १५ वर्षांत लुटून खाल्ले आहे. राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि राजकीय गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना उत्तर प्रदेशची नव्या विकास पर्वाकडे वाटचाल होताना पाहवले जात नाही, अशी जळजळीत टीका त्यांनी केली. पूरग्रस्त सिंघानी गावात लोकांना मदतकार्याचे वाटप त्यांच्या हस्ते करण्यात आले, त्या वेळी योगी बोलत होते.  

कोणत्याही राजकीय पक्षाचे नाव न घेता योगी म्हणाले, राज्याचा विकास झाला तर त्यांचे जातीयवादाचे राजकारण आणि घराणेशाही संपुष्टात येईल, अशी भीती विरोधी पक्षांना वाटते. या राजकीय पक्षांचे जातीयवादी राजकारणाचे आणि घराणेशाहीचे दिवस आता संपले आहेत. त्यामुळेच विकासकामात खोडा घालण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू असल्याची टीका त्यांनी केली.  
 
समाजकंटकांना वठणीवर आणा
महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा देऊन योगी म्हणाले, अशा प्रकरणांत बरबटलेल्या समाजकंटकांवर खंबीरपणे कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले. महिलांची छेडछाड, बलात्कारासारखे गुन्हे करणारे समाजकंटक समाजासाठी घातक असून त्यामुळे सरकारी यंत्रणेवर टीका केली जात आहे. अधिकाऱ्यांना अशा गुन्हेगारांना वठणीवर आणण्यात अपयश येत असेल तर त्यांना सरकारी नोकरीत राहण्याचा अधिकार नाही, असेही मुख्यमंत्री योगी यांनी बजावले. 
 
विद्यार्थ्यांनी दाखवले काळे झेंडे  
आदित्यनाथ योगी यांचे भाषण चालू असताना विद्यार्थी संघटनेच्या दोन नेत्यांनी त्यांच्या भाषणात अडथळे अाणत, योगींच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडेही दाखवले. मात्र, पोलिसांनी तत्काळ त्यांच्याकडे धाव घेत या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. मुख्यमंत्र्यांनी भाषणात एका तरुणीच्या खून प्रकरणाचा उल्लेख केला तेव्हा निदर्शकांनी त्यांच्या भाषणात अडथळे आणले. या विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिस अधीक्षक विजय पालसिंग यांनी सांगितले.  

राज्यातील पूरपरिस्थितीबाबत बोलताना योगी म्हणाले, पुराच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी कृती योजना तयार करण्यात आली असून ती केंद्राकडे सादर करण्यात आली आहे.  पूरपरिस्थिती सांगून येत नाही, पण त्यास तोंड देण्यासाठी आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर तयारी असली पाहिजे, असे सांगून ते म्हणाले, पूरग्रस्त जिल्ह्यात मदतनिधीचे वाटप करण्याकडे मंत्र्यांना लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
 
बातम्या आणखी आहेत...