आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूपीत महाआघाडी नव्हे, केवळ विलीनीकरण शक्य : मुलायम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी सपासह जनता परिवारातील चर्चेच्या दुसऱ्याच दिवशी महाआघाडी हा तूर्त तरी फुसका बार ठरला. राज्यात केवळ पक्षांचे विलीनीकरण होणे शक्य आहे. महाआघाडी नव्हे, असे सपाप्रमुख मुलायमसिंह यांनी स्पष्ट केले.
राज्यात आघाडी होणे शक्य नाही, असे मुलायम यांनी गुरुवारी तातडीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर करून टाकले आहे. जनता पक्षांच्या नेत्यांसोबत मुलायम यांची बुधवारी दीर्घ चर्चा झाली. त्यासाठी नेत्यांमध्ये बैठकांवर बैठका सुरू होत्या. दिल्ली व लखनऊमध्ये प्रशांत किशोर यांच्यासोबत बैठक घेतल्याच्या पार्श्वभूमीवर सपाच्या हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले होते. प्रशांत यांनी मुख्यमंत्री अखिलेश यांच्याशीदेखील अनेक बैठका घेतल्या. त्यातून जनता परिवाराशी आघाडीच्या चर्चेला वेग आला होता. महाआघाडी स्थापनेची चर्चा असली तरी प्रत्यक्षात ही गोष्ट वाटते तितकी सोपी नक्कीच नाही, असे अखिलेश यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले होते. त्यामुळेच आता सपाने ‘एकला चलो’ची तयारी केली आहे. सत्ताधारी पक्ष स्वबळावर निवडणूक लढवू शकेल, असे दिसू लागले आहे. परंतु अद्यापही आघाडीबाबतचा संभ्रम कायम आहे.

किशोर यांच्या बैठकांमुळे संभ्रम
प्रशांत किशोर व सपाप्रमुख मुलायम यांच्यात अनेक बैठका झाल्या. त्याशिवाय राष्ट्रीय लोकदलप्रमुख अजित सिंह यांच्यासोबतही प्रशांत किशोर यांची बैठक झाली होती. त्यामुळे उत्तर प्रदेशात महाआघाडी होण्याची चिन्हे आहेत, अशी चर्चा सुरू झाली होती. परंतु आता पुन्हा संभ्रम निर्माण झाला आहे.

मुलायम अनुभवी नेते, तेच निर्णय घेतील
^नेताजी अनुभवी नेते आहेत. त्यामुळे कोणत्या पक्षासोबत आघाडी करावी याबाबतचा निर्णय मुलायम हेच घेतील. महाआघाडी करावी किंवा नाही हेदेखील तेच ठरवतील.
-अखिलेश यादव, मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश.
काँग्रेसला १००-१२५ जागा हव्यात
काँग्रेसला १०० ते १२५ जागा हव्या आहेत. त्याबाबत अखिलेश यादव मात्र फार उत्साही दिसून आले नाहीत. विद्यमान विधानसभेत काँग्रेसचे २९ आमदार आहेत. राष्ट्रीय लोकदलाचे अजित सिंह यांनी नेमक्या किती जागांचा प्रस्ताव ठेवला होता, हे मात्र समजू शकले नाही. समाजवादी पार्टी बिहारमधील महाआघाडीतील सहकारी पक्ष आहे. त्यात जदयू, राजद, काँग्रेसही होते. या महाआघाडीने भाजपच्या नेतृत्वाखालील रालोआचा बिहार निवडणुकीत मोठा पराभव केला होता.
बातम्या आणखी आहेत...