आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

UP, पंजाब, गोवा निवडणूक: 40 टक्के जागांवर नेत्यांचा मुले, नातू, पत्नीसाठी तिकिटाचा आग्रह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्तर प्रदेशात दोनच फॅक्टर काम करतात. जातीयवाद आणि घराणेशाही. ज्यांचा या मुद्द्यांना विरोध आहे, तोच याला खतपाणी घालत असतो. ४०३ विधानसभा जागांसाठी या वेळी अनेक मोठे नेते कुटुंबीयांनाच तिकीट देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. प्रत्येक पक्षाची अवस्था पाहू जाता, सुमारे ४० टक्के जागांवर कोणी आपली मुले, पत्नी, नातवासाठी तिकीट मागतो आहे. यात भाजप, काँग्रेस, सपा आणि बसपमधील नेत्यांचा समावेश आहे. या पक्षांचे पदाधिकारी स्वत:साठी किंवा कुटुंबीयांसाठी तिकिटे मागतात. 

भाजपमध्ये १२ नेते सक्रिय
कुटुंबियांसाठी सर्वाधिक तिकीटे मागण्याचे काम याच पक्षात होते आहे. पक्षांतील केंद्रीय मंत्री, अप्रत्यक्षरित्या मुलांसाठी किंवा नातेवाइकांसाठी तिकीटांसाठी शिफारस करत आहेत. मायावतीविरुद्ध वक्तव्ये केल्याबद्दल पक्षातून निलंबित करण्यात आलेले दयाशंकर स्वत: व पत्नी स्वातीसिंगसाठी तिकीट मागत आहेत. 
 
उत्तराखंडातही घराणेशाही
मुख्यमंत्री हरीश रावत मुलगी अनुपमा, मुलगा वीरेंद्र आणि आनंद यांच्या तिकिटासाठी प्रयत्नशील आहेत. अर्थमंत्री इंदिरा हृदयेश मुलगा सुमीतसाठी, तर मंत्री यशपाल आर्य संजीवसाठी प्रयत्नशील आहेत. 

काँग्रेसमध्येही स्पर्धा
निवडणुकीत घराणेशाहीचा मुद्दा हिरिरिने मांडणाऱ्यांत काँग्रेस नेते नातेवाइकांसाठी तिकीटे मागण्यात सर्वात पुढे आहेत. 
 
बसपमध्येही तीच कथा
बसपमधील मोठे नेते रामवीर उपाध्यायांच्या घरातही भाऊ आणि पत्नीवरून राजकारण सुरू आहे. गेल्या मंत्रिमंडळात रामवीर उपाध्याय मंत्री होते, भाऊ मुकुल उपाध्याय, आमदार तर पत्नी सीमा खासदार होत्या. बसपचा मुस्लिम चेहरा अशी ओळख असलेले नेते नसिमुद्दिन सिद्दिकी यांच्या घरातील तिघे राजकारणात होतेे. त्यांची पत्नी हुस्ना राज्यसभेच्या खासदार होत्या.

परंपरागत जागा
 
या जागांवर उमेदवार तेच फक्त निवडणूक चिन्ह बदलत असते
छोटेलाल वर्मा : फतेहाबाद आग्रा

१९९३ पासून याच मतदासंघावर ५ वेळा छोटेलाल वर्मा यांचेच वर्चस्व कायम आहे. येथून ते तीन वेळा आमदार झाले तर दोनवेळा दुसऱ्या क्रमांकावर राहिले. मागील तीन निवडणुका त्यांनी वेगवेगळ्या चिन्हावर लढवल्या होत्या. 

शेर बहादूर : जलालपूर (अांबेडकरनगर)
येथून शेर बहादूर आता सपाचे आमदार आहेत. या जागेवर १९८० मध्ये काँग्रेसकडून, ८५ मध्ये अपक्ष, ९६ मध्ये भाजप आणि २००७ मध्ये बसपचे आमदार होते. २०१७ साठी ते भाजपकडून तिकीट मिळवण्यासाठी इच्छुक आहेत.
 
अखिलेश कुमार सिंह : रायबरेली
रायबरेली विधानसभा मतदारसंघातून १९९३ पासून आतापर्यंत अखिलेशकुमार प्रतिनिधित्व करत आहेत. २०१२ मध्ये पीस पार्टी,२००७ मध्ये अपक्ष म्हणून निवडून आले. २००२, १९९६ व १९९३ मध्ये ते काँग्रेसकडून निवडून आले.

शिवेंद्र सिंह : सिसवा (महाराजगंज) 
आता सपाचे आमदार पण याआधी १९८५, ९१मध्ये काँग्रेस, ९६ मध्ये बसप आणि २००२ मध्ये भाजपकडून लढले.

राजा महंेद्र अरिदमन सिंह : बाह
राजा महेंद्र अरिदमनसिंह सपाचे आमदार आहेत. अनेक पक्षात होते. आग्ऱ्यातील बाह विधानसभेत १९८९ पासून आजपर्यंत आमदार म्हणून कायम आहेत. 

सुरेंद्र पटेल : गंगापूर फिर सेवापुरी
२००२ मध्ये गंगापूर अपना दलाकडून, तर २००७ मध्ये सपाकडून आणि २०१२ मध्ये सेवापुरी येथून निवडणूक जिंकली आहे.
 

कलंकित उमेदवार विजयी
 
मुख्तार अन्सारी : मऊ
माफिया ते राजकारणी बनलेले मुख्तार अन्सारी सलग चारवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. १९९६ मध्ये बसपचे आमदार झाल्यानंतर पुढील दोन वेळा अपक्ष म्हणून आमदार म्हणून निवडून आले.
 
हरिशंकर तिवारी: चिल्लूपार क्षेत्र
काँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्षांच्या तिकिटावर हरिशंकर तिवारी चिल्लूपार येथून २३ वर्ष सलग प्रतिनिधीत्व करत आहेत. 

अफजाल अंसारी: मोहम्मदाबाद
मुख्तारचे मोठे बंधू अफजल गाझीपूरच्या मोहम्मदाबाद विधानसभा मतदासंघातून १९८५ पासून ९६ पर्यंत सलग निवडून आले आहेत. २००२ मध्ये ते भाजपकडून पराभूत झाले. 

रघुराज प्रताप सिंह: कुंडा
राजा भैया उत्तर प्रदेश सरकारमध्ये  अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री होते. प्रतापगडच्या कुंडा येथून आमदार म्हणून निवडून आले आहेत. 

दुर्गा प्रसाद यादव, आजमगढ़ 
आजमगडचे आमदार असून त्यांच्यावर १४ हुन अधिक गुन्हे दाखल आहेत. यात रुग्णालयात चार व्यक्तींची हत्या केल्याचा आरोप आहे.

पंजाब : आपच्या जर्नेलसिंगांनी आमदारकी सोडली
नवी दिल्ली- दिल्लीच्या राजौरी गार्डन येथून निवडून आलेल्या आपच्या जर्नेलसिंग यांनी आमदारकीचा राजीनामा दिला असून आता ते पंजाबच्या निवडणूक आखाड्यात उतरले आहेत. पक्षांने त्यांना लंबी मतदारसंघात मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या विराेधात उमेदवारी दिली आहे. बादल या मतदारसंघाचे सलग ५ वेळा प्रतिनिधीत्व करत आहेत.
 
जर्नेलसिंग यांनी सांगितले, पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या विरोधात  निवडणूक लढवण्यासाठी दिल्लीतील आमदारकीचा राजीनामा दिला आहे. माजी पत्रकार असलेले जर्नेलसिंग यांनी शिखविरोधी दंगलीच्या मुद्द्यावरुन माजी गृहमंत्री चिदंबरम यांच्यावर जोडे फेकल्याने चर्चेत आले. त्यानंतर ते आपमध्ये सहभागी झाले आणि राजोरी गार्डन येथून निवडून आल्यानंतर  आपचे आमदार झाले. 

अमृतसर लोकसभेच्या जागेवर पोटनिवडणूक ४ फेब्रुवारी रोजी  
नवी दिल्ली- अमृतसरच्या लोकसभेच्या जागेवरील पोटनिवडणूक ४ फेब्रुवारी रोजी होईल. पंजाब काँग्रेस अध्यक्ष कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी या जागेचा राजीनामा दिला होता. निवडणूक आयोगाने शुक्रवारी पोटनिवडणुकीची घोषणा केली होती. सतलज-यमुना जोडकालव्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यांनी संसद सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. कारण की हा पंजाबच्या लोकांवरील अन्याय आहे. आयोगाच्या म्हणण्यानुसार, ११ जानेवारी रोजी पोटनिवडणुकीची अधिसूचना जारी केली जाईल. त्यानंतर नामांकनासाठी १८ जानेवारी अंतिम तारीख असेल. १९ जानेवारी रोजी अर्जांची 
छाननी होईल.

 
गोवा : भाजपच्या पहिल्या यादीत २१ उमेदवारांची नावे जाहीर
नवी दिल्ली- गोवा विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने आपली २१ उमेदवारांच्या नावांची पहिली यादी जाहीर केली आहे. उमेदवारांच्या यादीत मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर यांचेही नाव यात समाविष्ट आहे.  गोवा भाजपाचे प्रवक्ते नरेंद्र सवाईकर यांनी सांगितले की, उमेदवारांची अंतिम यादी मंजूरीसाठी संसदीय समितीकडे पाठवली. सियोलिम मधून उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसूझा व वर्तमान कॅबिनेट मंत्री दयानंद मांदरेकर, साळगावमधून दिलीप पुरुलेकर, शिरोड्यातून महादेव नाईक, मुरगावमधून मिलींद नाईक.यांची नावे आहेत.
बातम्या आणखी आहेत...