आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूपीचे राजकारण: राहुल गांधी चांगला माणूस, मैत्री होऊ शकते : अखिलेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ- काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे माणूस म्हणून चांगले आहेत, त्यांनी राज्यात आणखी वेळ घालवला तर आमची ‘मैत्री’होऊ शकते, असे सूचक विधान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी गुरुवारी केले. अखिलेश यादव यांच्या या विधानामुळे उत्तर प्रदेशात नव्या राजकीय आघाडीचे संकेत मिळत आहेत.

राहुल गांधी सध्या उत्तर प्रदेशच्या अडीच हजार किमीच्या ‘किसान महायात्रे’वर आहेत. ते या यात्रेत केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्रमकपणे टीका करत आहेत, पण राज्यातील समाजवादी पक्षाबद्दल त्यांची भूमिका मवाळ असल्याचे दिसत आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर त्याबाबत विचारले असता अखिलेश यादव म्हणाले की, ‘राहुल जी बहुत अच्छे इन्सान हैं। बहुत अच्छे लडके हैं। यूपी में ज्यादा रहेंगे तो हमारी भी उनसे अच्छी दोस्ती होगी... दो अच्छे लोग मिल जाये तो क्या खराब है?’ अखिलेश यांच्या या टिप्पणीनंतर राज्यात समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात युती होण्याची शक्यता आहे का, असा प्रश्न विचारला असता, ‘आप इसमें राजनीती क्यूं देख रहे है?,’ असा प्रतिप्रश्न अखिलेश यांनी विचारला.

राहुल गांधी यांच्या ‘खाट पंचायती’नंतर काही स्थानिक नागरिकांनी त्यांच्या सायकलींवर खाटा पळवल्या होत्या. त्यावर टिप्पणी करताना अखिलेश म्हणाले की, सायकलीचा त्यांना काहीतरी फायदा झाला आहे. समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्या नेल्या असत्या तर समाजवादी गुंडांनी त्या पळवल्या असे तुम्ही (माध्यमांनी) म्हटले असते.

एका ‘युवराजा’ची दुसऱ्या ‘युवराजा’ला मदत; भाजपची टीका
उत्तर प्रदेशच्या किसान महायात्रेत राहुल गांधी मोदी सरकारवर आक्रमक टीका करत आहेत. हे म्हणजे एक ‘युवराज’ दुसऱ्या ‘युवराजा’ला (अखिलेश) मदत करत आहे, अशी टीका भाजपने गुरुवारी केली. भाजपचे राष्ट्रीय सचिव श्रीकांत शर्मा म्हणाले की, उत्तर प्रदेशात पाणी, वीज आणि रस्त्यांच्या समस्यांनी लोक त्रस्त आहेत. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातही राज्य मागे आहे. अशा स्थितीत समाजवादी पक्ष आणि बसपच्या १५ वर्षांच्या गैरकारभारावर टीका करण्याऐवजी राहुल गांधी भाजपवरच टीकास्त्र सोडत आहेत. हा एका युवराजाने दुसऱ्या युवराजाला मदत करण्याचा अपयशी प्रयत्न आहे. मायावतींच्या गैरकारभाराला कंटाळून उत्तर प्रदेशच्या मतदारांनी अखिलेश यादव यांना निवडून दिले.पण त्यांच्या राज्यातही गुंडगिरी आणि भ्रष्टाचार वाढला आहे, अशी टीकाही शर्मा यांनी केली.

महापुरुषांचे ठेकेदार होऊ नका, होऊ देऊ नका
उत्तर प्रदेशचे मंत्री आझम खान यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या कथित वादग्रस्त टिप्पणीबद्दल विचारले असता अखिलेश यादव म्हणाले की, या मुद्द्याला राजकीय रंग दिला जाऊ नये. उत्तर प्रदेशात निवडणुका जवळ आल्या आहेत. कोणीही महापुरुषांचे ठेकेदार होऊ नये. आपणही त्यांनी महापुरुषांचे ठेकेदार होऊ देऊ नये.

अखिलेश म्हणाले की, मंत्रिमंडळाच्या बैठकीत उत्तर प्रदेश युवक धोरण-२०१६ आणि मोफत स्मार्टफोन देण्याच्या योजनेबाबत चर्चा झाली. स्मार्टफोनची नोंदणी लवकरच सुरू होईल. स्मार्टफोनमुळे सरकार आणि नागरिक यांच्यातील अंतर दूर होईल तसेच ग्रामीण भागाला माहिती लवकर मिळेल. सरकारच्या योजना आणि धोरणे सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचत नाहीत. स्मार्टफोनमुळे त्यासाठी मदत होईल.
बातम्या आणखी आहेत...